मुंबई : केंद्र सरकारच्या निर्देशानुसार संपूर्ण देशभरात 22 जुलै ते 28 जुलै या कालावधीत ‘शिक्षण सप्ताह’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमानुसार आठवड्यातील प्रत्येक दिवशी एका विशिष्ट उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
केंद्र सरकारच्या या उपक्रमाच्या अंतर्गत 28 जुलैला “समुदाय सहभाग दिवस” साजरा केला जाणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून तिथी भोजन, विद्यांजली असे काही उपक्रम राबवले जाणार आहेत. परंतु, स्नेहभोजन किंवा तिथी भोजन यासाठी संबंधित शाळेच्या शिक्षक, मुख्याध्यापकांकडे महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.
स्नेहभोजनाच्या उपक्रमासाठी गावातील दानशूर व्यक्ती, लोकप्रतिनिधी, विविध सामाजिक संस्था आणि शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांना स्नेहभोजन देण्याकरीता आवाहन करण्यात यावे, असे आदेश प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी राज्यातील सर्व शाळांना दिले आहेत. त्यामुळे आता गावातील दानशूर व्यक्तींचा शोध घेण्याची जबाबदारी मुख्याध्यापक आणि शिक्षकांवर देण्यात आली आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे या उपक्रमासाठी एखादी दानशूर व्यक्ती किंवा अन्य कोणी सापडले नाही, तर शिक्षकांनी आणि मुख्याध्यापकांनी स्वतःच्या खिशातून यासाठीचा खर्च करायचा आहे, अशी माहिती देखील समोर आली आहे.
या तिथी अथवा स्नेहभोजनाच्या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पूर्ण जेवण, मिठाई किंवा पूरक पोषक आहार देण्यात यावे, असे आदेश देण्यात आले आहेत. या आहारात मोड आलेली कडधान्ये, शेंगदाणे, सुका मेवा, काजू, बदाम, पिस्ता, मनुका, आक्रोड, बेदाणे, फळे, शिजविलेले पदार्थ, मिष्टान्न इत्यादीचा समावेश असलेले अन्नपदार्थ विद्यार्थ्यांना देण्यात यावेत, असेही सांगितले आहे. भोजनात कोणत्या पदार्थाचा समावेश करावा याबाबत संबंधित शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीने व देणाऱ्या व्यक्तीनी परस्पर सहमतीने एकत्रित निर्णय घ्यावा, असेही आदेशात म्हटले आहे.
तसेच खाद्य पदार्थ हे ताजे व पौष्टिक असावेत, तांदूळ, गहू, नाचणी, शेवगा शेंग, डाळींसोबत हिरव्या पालेभाज्या प्राधान्याने दिल्या जाव्यात. बाजारातील जंक फूड, तसेच उघड्यावरील आणि शिळे अन्नपदार्थ विद्यार्थ्यांना देण्यात येऊ नयेत. यासोबतच जंक फूडच्या हानिकारक परिणामांबद्दल विद्यार्थी आणि पालक तसेच लोकांमध्ये जागरूकता निर्माण करावी, असे निर्देश शरद गोसावी यांनी दिले आहेत.
विशेष बाब म्हणजे खाद्य पदार्थाचे विद्यार्थ्यांना वितरण करताना वितरकाने शाळेत उपस्थित रहावे. तसेच खाद्य पदार्थ विद्यार्थ्यांना शाळेमध्येच दुपारच्या सुट्टीत तथा शालेय वेळेतच देण्यात यावेत. सदर स्नेहभोजनातून अनुचित प्रकार घडणार नाही, याची दक्षता संबंधित वितरक आणि शाळेने घेणे आवश्यक आहे. आहाराचे वितरणाकरीता आवश्यक ती खबरदारी घेण्यात यावी. समुदाय सहभाग दिवस मोठ्या प्रमाणात साजरा करावा, तसेच राबविण्यात आलेल्या सर्व उपक्रमाबाबतची माहिती महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांनी उपलब्ध करुन दिलेल्या लिंकवर विहित वेळेत अद्यावत करण्यात यावी, असे आदेश जिल्हास्तरीय शिक्षण विभागाला राज्याचे शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिले आहेत.
या सरकारच्या निर्णयावर पालक वर्गातून तीव्र प्रतिक्रिया येताना दिसत आहे. पालकांनी म्हटले आहे की, सरकारला शिक्षणाचं काहीही पडलेलं नाही. विद्यार्थी व शिक्षक यांचे वाटोळे करुन जनता हुशार होऊ द्यायचीच नाही,असा चंगच सरकारने बांधला आहे. शिक्षकांना शिकवू व विद्यार्थ्यांना शिकूच द्यायचे नाही, हाच खरा हेतू सरकारचा आहे. शिक्षणाचे खाजगीकरण करून गरीबांना शिक्षणच घेऊ द्यायचे नाही, असा एककलमी कार्यक्रम दिसतो आहे. तसेच शिक्षकांनी शिकवायचे सोडून बाकी सर्व कामं करायची का? असा सवाल पालकांनी उपस्थित केला आहे.