केडगाव : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत विहीर बांधण्यासाठी आता चार लाख रुपयांचे अनुदान दिले जाणार असून, मागील काळात हे फक्त तीन लाख रुपये होते. यामुळे विहीर खोदून कोरडवाहू शेतीला बागायती करण्यासाठी ही योजना कल्याणकारी ठरणार आहे.
अनेक ठिकाणी जलस्त्रोत उपलब्ध नसल्याने काही जण कोरडवाहू शेती करत आहेत आणि पावसाच्या भरवश्यावर आपली शेती पिकवत असतात. परंतु, त्यातून शेतकऱ्यांना अधिकसे उत्पादन मिळत नाही. तसेच अनेक अस्मानी संकटांना त्यांना सामोरे जावे लागत असते. त्यात आता पावसाची पण अनियमितता वाढल्याने अनेक शेतकरी हवालदिल झालेले आहेत.
शेतकरी शेतात विहीर बोअर असेल आणि त्यात पाणी असेल तर शेतकरी विविध पिके फळ पिके घेऊन उत्पन्नाचा मार्ग शोधू शकतो. परंतु विहीर खोदण्यासाठी भरमसाठ असा खर्च येतो. ही बाब पाहता शासनाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी मनरेगा अंतर्गत विहीर खोदण्यासाठी चार लक्ष रुपयांचे अनुदान दिले जात आहे. तसेच प्रत्येक गावात प्रतिवर्षी पंधरा विहिरी खोदण्याचे उद्दिष्ट असून, प्रशासनाकडून त्याबाबतही ग्रामीण भागात जनजागृती केली जात आहे. त्यामुळे प्रत्येक गावातील गरजवंत शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा.
कोणते शेतकरी घेऊ शकतात फायदा?
या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती, जमाती, भटक्या जमाती भटक्या विमुक्त जमाती व दारिद्र रेषेखालील दिव्यांग व अल्पभूधारक हे शेतकरी मागेल त्याला विहीर या योजनेचे लाभ घेऊ शकतात.
कुठं आणि कसा करावा अर्ज?
मनरेगा योजनेअंतर्गत विहीर योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामपंचायतकडे आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करावा लागणार आहे.
विहीर योजनेचा लाभ तत्काळ मिळेल
मनरेगा अंतर्गत विहीर योजनेचा लाभ घेण्यासाठी गरजूंनी तत्काळ ग्रामपंचायतीकडे अर्ज करावा व ग्रामसभेच्या ठरावानंतर लाभार्थ्यांना विहीर योजनेचा लाभ तत्काळ मिळेल व लागेल ते सहकार्य आम्ही करू. मात्र, शेतकऱ्यांनी लागणारी कागदपत्रे वेळेत जमा करावी व याचा लाभ घ्यावा.
– सचिन वाघमोडे, तांत्रिक अधिकारी, पंचायत समिती, दौंड.