पुणे : राज्यात जेएन.१ चे सर्वाधिक रुग्णसंख्या पुण्यात आहेत. राज्यात हा आकडा २५०च्या वर आहे. तर, एकट्या पुण्यात जेएन.१ संसर्गाचे १५० रुग्ण आहेत. कोरोनाला आळा घालण्यासाठी महापालिकेने महापालिकेच्या प्रयोगशाळांत खासगी रुग्णालयांना संशयित रुग्णांची करोना चाचणी करण्याचे निर्देश दिले आहेत.
बाजारात रॅपिड अँटिजेन चाचणी किटचा तुटवडा निर्माण झाल्याने चाचणी कशी करायची, असा प्रश्न रुग्णालयांसमोर उपस्थित झाला होता. यातून मार्ग काढण्यासाठी, आता महापालिकेच्या प्रयोगशाळांत खासगी रुग्णालयांना रुग्ण तपासणीसाठी पाठविण्यास सांगण्यात आले आहे.
आता किटचा तुटवडा असल्याने महापालिकेच्या प्रयोगशाळांत खासगी रुग्णालये त्यांचे रुग्ण करोना चाचणीसाठी पाठवू शकतात, अशी भूमिका महापालिकेने घेतली आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयांसमोरील रुग्णांच्या करोना चाचणीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. महापालिकेकडून रुग्णालयांना चाचणी केंद्राची यादी पाठविण्यात आली आहे, अशी माहिती आरोग्य विभागातील सूत्रांनी दिली.
महापालिकेने खासगी रुग्णालयांना रॅपिड अँटिजेन चाचण्या करण्याचे निर्देश दिले. मात्र, या किटचा तुटवडा असल्याने चाचण्या करणे शक्य होत नव्हते. आता महापालिकेच्या चाचणी केंद्रामध्ये खासगी रुग्णालयांतील रुग्णांच्या चाचण्या होतील, असे हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडियाचे (पुणे शाखा) अध्यक्ष डॉ. संजय पाटील यांनी सांगितले.