पुणे : पुण्याचे नवीन पोलीस आयुक्त अमितेश कुमार पदभार स्वीकारताच अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. गेल्या काही वर्षात पुण्यात गुन्हेगारांनी उच्छाद मांडला आहे. या सर्वांना जरब बसावी म्हणून पुणे शहरातल्या सर्व गुन्हेगारांची मंगळवारी पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात परेड काढण्यात आली. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली होती. त्यानंतर बुधवारी लगेच गुन्हे शाखा सामाजिक सुरक्षा विभाग आणि अंमली पदार्थ विरोधी पथकांकडून अवैध धंदे आणि अंमली पदार्थ तस्कारांची पोलीस आयुक्त कार्यालयात परेड काढण्यात आली.
काही दिवसांपूर्वी ड्रग्ज तस्कर ललित पाटील याचं रॅकेट पुण्यात आढळल्याने खळबळ उडाली होती. आतापर्यंत गँगवार आणि गुन्ह्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या पुण्यात ड्रग्स तस्करांनीही हातपाय पसरल्याचे समोर आले आहे. ही कीड समूळ नष्ट करण्याचा निश्चय नवीन पोलीस आयुक्त यांनी केला असून आज या गुन्हेगारांना त्यांनी चांगलाच दम भरला.
बेकायदेशीर पिस्टल बाळगणारे, मटका, जुगार, क्लब, लॉटरी, अवैध पत्त्यांचा क्लब चालविणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांना बुधवारी गुन्हे शाखा, सामाजिक सुरक्षा विभागाकडून बोलविण्यात आले होते. यावेळी अवैध धंदे करणाऱ्यांची परेड घेण्यात आली. यामध्ये नाईक, आंदेकर, कुंभार याच्यासह चर्चित अवैध व्यावसायिकांना अवैध काम आढळून आल्यास मोठ्या कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा देण्यात आला आहे.