पुणे : गुगलवर रिव्ह्यू देऊन पैसे कमावण्याचे आमिष महिलेला चांगलेच महागात पडले आहे. महिलेला तब्बल १० लाख ४८ हजारांचा गंडा घालण्यात आला आहे. याप्रकरणी महिलेने विमानतळ पोलिसांकडे फसवणूकीची तक्रार दाखल केली आहे.
फिर्यादी ४४ वर्षीय महिलेला अनोळखी मोबाइल क्रमांकावरून संपर्क साधून गुगलवर रिव्ह्यू देण्याचे काम सागण्यात आले होते. तक्रारीत म्हटल्यानुसार हा प्रकार २७ डिसेंबर २०२३ ते ३० डिसेंबर २०२३ यादरम्यान घडला आहे.
त्यामार्फत घरबसल्या पैसे मिळवता येतील असे आमिष दाखवण्यात आले. सुरुवातील चांगला मोबदला देऊन महिलेचा विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर आणखी पैसे मिळू शकतात असे आमिष दाखवून महिलेला प्रीपेड टास्क करण्याचे सांगितले. त्याप्रमाणे महिलेने प्रीपेड टास्क करण्यास सुरुवात केली. त्यावर वेगवेगळी कारणे देऊन पैसे उकळण्यात आले.
महिलेला एकूण १० लाख ४८ हजार रुपये भरण्यास भाग पाडले. काही कालावधीनंतर पैसे भरूनही मोबदला देण्याचे बंद केल्याने महिलेने विचारणा केली. त्यावेळी त्यांना समोरून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून महिलेने विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात मोबाईल क्रमांकावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.