पुणे : होळी सणासाठी कोकणात गावाकडे जाणाऱ्यांची होणारी गर्दी लक्षात घेता कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय होऊ नये यासाठी एसटी महामंडळाने नियमित बसेस व्यतिरिक्त पुण्यातून ६२ जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
३ ते ६ मार्च दरम्यान या गाड्या कोकणातील मार्गावरून धावणार आहेत. स्वारगेट आणि पिंपरी चिंचवड स्थानकातून जादा बसेस सोडणार असल्याची माहिती एसटी प्रशासनाने दिली आहे.
गणेशोत्सवाबरोबरच होळीचा सणही कोकणात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या सणासाठी पुण्यातून चाकरमानी कोकणातील आपापल्या गावी जात असतात.
त्यामुळे या सणाच्या काळात प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. अशा प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी एसटी सज्ज झाली असून महामंडळाने पुण्यातून यंदा जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, आगाऊ आरक्षणासाठी एसटी महामंडळाच्या https://msrtc.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळाबरोबरच Msrtc Mobile Reservation App तिकीट आरक्षित करता येईल.
त्याशिवाय, एसटी आगारातून ही या विशेष बसेससाठी तिकीट आरक्षण करता येईल. सुरक्षित प्रवासासाठी एसटी बसेसमधून प्रवास करण्याचे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.