पुणे : रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांच्या सेवेसाठी अनेक उपाययोजना केल्या जातात. त्यात आता जवळपास सर्वच प्रवाशांच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न. हाच प्रश्न रेल्वेने सोडवण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आता पुणे रेल्वे स्थानकावर फक्त पाच रुपयांमध्ये लिटरभर पाणी मिळणार आहे.
पुणे रेल्वे प्रशासनाकडून पुण्यातील रेल्वे स्थानकावर वॉटर व्हेंडिंग मशीन लावण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता रेल्वे प्रवाशांना फक्त पाच रुपयांमध्ये एक लिटर पाणी मिळणार आहे. वॉटर व्हेंडिंग मशीन यापूर्वीच लावण्यात आल्या होत्या. मात्र, त्यातील काही कार्यरत नव्हत्या. त्यामुळे या सर्व मशीन्स पुन्हा सुरु कराव्यात अशी मागणी केली जात होती.
दरम्यान, प्रवाशांची मागणी लक्षात घेत सततच्या पाठपुराव्यामुळे या मशीन पुन्हा सुरु करण्यात आल्या आहेत. यासोबतच प्रवाशांना अवघ्या पाच रुपयांमध्ये आपली बॉटल रिफील करून घेता येणार आहे.
वर्षभरापूर्वीच सुरु झाली योजना पण…
पुण्यात येणाऱ्या रेल्वे प्रवाशांची पाण्याच्या प्रश्नावरून गैरसोय होत होती. ही गैरसोय लक्षात घेता सुमारे वर्षभरापूर्वीच पुणे रेल्वे प्रशासनाकडून या योजनेचा शुभारंभ करण्यात आला होता. मात्र, काही काळ चालल्यानंतर या वॉटर व्हेंडिंग मशीन बंद अवस्थेत होत्या. मात्र, आता मशिन्स सुरु करण्यात आल्या आहेत. सध्या या वॉटर व्हेंडिंग मशीन पुणे रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म नंबर एकवर ठेवण्यात आल्या आहेत.