पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात गेल्या १२ वर्षांपासून प्राध्यापक भरती न झाल्याने, विविध शैक्षणिक विभागांमध्ये निम्म्याहून अधिक प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहेत. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर होत असल्याच्या तक्रारी सातत्याने होत होत्या. आता विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पुणे विद्यापीठातील प्राध्यापकांच्या २१५ रिक्त पदांपैकी १११ जागांवर पूर्णवेळ प्राध्यापकांची भरती होणार आहे. येत्या आठवड्यात त्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केल्या जाणार असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली. आता विद्यापीठाच्या विविध शैक्षणिक विभागांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पूर्णवेळ प्राध्यापक मिळणार असल्यामुळे विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.
पुणे विद्यापीठात सध्या पूर्णवेळ अध्यापन करणाऱ्या प्राध्यापकांची संख्या बोटावर मोजण्याइतकी आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने कंत्राटी तत्वावर काही काळासाठी १३३ प्राध्यापकांची भरती प्रक्रिया राबवली. काही दिवसांपूर्वी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने विद्यापीठाला १११ रिक्त पदे भरण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यानुसार ही पदे भरण्यासाठीची जाहिरात पुणे विद्यापीठाकडून प्रसिद्ध केली जाणार आहे. त्याची माहिती विद्यापीठाच्या वेबसाइटवरही मिळेल, अशी माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली. विद्यापीठाच्या प्रशासनामध्येही काही पदे भरण्यात येणार आहेत. त्याबाबतच्या जाहिरातीही लवकरच प्रकाशित केल्या जातील, असे प्रशासनाने सांगितले आहे.
सेट परीक्षा ७ एप्रिलला होणार
दरम्यान, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून सहाय्यक प्राध्यापक पदासाठी घेण्यात येणारी सेट परीक्षा ७ एप्रिलला होणार आहे. या परीक्षेची तारीख विद्यापीठाने जाहीर करतानाच ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याच्या तारखा लवकरच प्रसिद्ध करण्यात येतील, असे सांगितले होते. त्यानुसार येत्या दोन ते तीन दिवसांत अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.
प्राध्यापक भरती प्रक्रिया पारदर्शीपणे राबविणार
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्राध्यापकांच्या १११ जागा भरण्याची प्रक्रिया सुरू असून, त्या अंतर्गत जाहिरात लवकरच येत्या आठवड्यात प्रसिद्ध केली जाणार आहे. हे प्राध्यापक साधारण पुढील २५ वर्षे विद्यापीठात कार्यरत राहणार आहेत. त्यामुळे संपूर्ण प्रक्रिया नियमांच्या अधीन राहून शैक्षणिक गुणवत्तेवर आणि पारदर्शी पद्धतीने राबविण्यात येईल.
– डॉ. सुरेश गोसावी, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ