पुणे : पुणेकरांसाठी गोड बातमी समोर आली आहे. पुणे शहरातील मोजक्या भागात मेट्रो सेवा सुरु झाली असून त्या भागात जाणाऱ्या लोकांचा प्रवास गारेगार आणि कमी वेळेत होत आहे. आता पुणे मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्याने चांगला वेग पकडला आहे. त्यामुळे शिवाजीनगर ते हिंजवडी हा तास-दीड तासांचा प्रवास केवळ 25 मिनिटांवर येणार आहे.
तास-दीड तासांचा प्रवास 25 मिनिटांत होणार..
हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाचे 74 टक्के काम पूर्ण झाले असल्याची माहिती समोर आली आहे. आता उर्वरित काम येत्या मार्चपर्यंत पूर्ण होणार आहे आहे, असे पीएमआरडीएचे मुख्य अभियंता रिनाज पठाण यांनी सांगितले. या मार्गावर मेट्रो सुरु करण्याचे उद्दिष्ट गाठण्यासाठी कामाला चांगलाच वेग आला आहे. सध्या हिंजवडी ते शिवाजीनगर या मार्गावर प्रवास पूर्ण करण्यासाठी रस्ते मार्ग हा एकच पर्याय असून त्यासाठी एक ते दीड तास लागतो. मात्र, आता मेट्रोमुळे पुणेकरांचा हा प्रवास 23 ते 25 मिनिटांत पूर्ण होणार आहे. ही बाब पुणेकरांना दिलासा देणारी आहे.
कसा असेल प्रकल्प?
तब्बल आठ हजार तीनशे कोटी रुपयांहून अधिक खर्च असणार हा मेट्रो प्रकल्प टाटा समूहाने हातात घेतला आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर 23.3 किमी मेट्रो मार्ग आहे. त्यावर एकूण 23 मेट्रो स्थानके असून या मार्गावर ताशी 80 ते 85 किमी वेगाने मेट्रो धावणार आहे. एका मेट्रोत 1000 प्रवासी बसू शकतात. या प्रकल्पाचा एकूण खर्च 8300 कोटी रुपये इतका आहे.
हिंजवडी या भागात माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक मोठ्या कंपन्या आहेत. पुणे शहरातून हिंजवडीत जाणाऱ्या सर्वांना वाहतूक कोंडीचा मोठा सामना करत कार्यालय गाठावे लागते. पुण्यातील या मार्गाचे महत्व लक्षात घेऊन 8 डिसेंबर 2018 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवाजीनगर ते बालेवाडी आणि हिंजवडी या मेट्रो प्रकल्पाचे भूमीपूजन करण्यात आले होते.