पुणे : पुणे मेट्रोकडून प्रवाशांसाठी एक आनंदाचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रवाशांच्या वाढत्या मागणीनुसार, जानेवारी २०२५ च्या अखेरीपासून मेट्रो सेवा रात्री ११.०० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. सध्या, वनाझ-रामवाडी आणि पिंपरी-स्वारगेट कॉरिडॉरवरील शेवटच्या गाड्या रात्री १०.०० वाजता सुटतात. मात्र, आता हा वेळ एक तास वाढवण्यात आला आहे, ज्यामुळे हजारो पुणेकरांना याचा अधिक फायदा होणार आहे. रात्री उशिरा प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी हा निर्णय अत्यंत फायदेशीर ठरणार असून, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील हा बदल प्रवाशांच्या वेळेची मोठी बचत करणार असेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
पुणे मेट्रोने आता सकाळी ६.०० ते रात्री ११.०० वाजेपर्यंत सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रात्री १०.०० नंतर प्रत्येक मार्गावर १० मिनिटांच्या अंतराने ६ अतिरिक्त फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. या सुविधेमुळे उशिरा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. शेवटची मेट्रो पकडण्यासाठी होणारी धावपळ कमी होऊन प्रवास अधिक सोयीस्कर आणि आरामदायी होणार आहे.
प्रवाशांच्या मागणीला प्रतिसाद..
प्रवाशांच्या वाढत्या मागणीला प्रतिसाद म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वे स्थानक, विमानतळ, येथून येणार्या प्रवाशांसह रात्री उशिरापर्यंतच्या प्रवाशांना सामावून घेण्याचे उद्दिष्ट आहे. प्रत्येक १० मिनिटांनी ट्रेन धावण्याचे नियोजन असणार आहे. १ जानेवारी २०२५ रोजी, पुणे मेट्रोने २०००,००० हून अधिक प्रवाशांनी प्रवास केला आहे. प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन, कामकाजाची वेळ वाढविण्याचा निर्णय मेट्रो प्रशासनाने घेतला आहे.