पिंपरी : पुणेकरांसाठी एक मोठी बातमी आहे. आता पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेनंतर पुणे जिल्ह्यात आणखी एक महापालिकेची स्थापना होणार आहे. चाकण नगरपरिषद, आळंदी नगरपरिषद आणि राजगुरू नगरपरिषद तसेच त्यांच्या लगतच्या परिसरातील गावांचा समावेश करून नवीन स्वतंत्र महापालिका करणे राज्य शासनाच्या विचाराधिन आहे. याबाबत विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडून राज्य शासनाने अभिप्रायासह अहवाल मागविला आहे.
पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये यापूर्वीच मोठ्या प्रमाणात गावांचा समावेश करून हद्दवाढ करण्यात आली आहे. यापुढे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरालगतच्या परिसरातील नवीन गावांचा या दोन्ही महापालिकेत समावेश करणे योग्य होणार नाही. चाकण नगरपरिषद, आळंदी नगरपरिषद व राजगुरू नगरपरिषद तसेच त्यांच्या लगतच्या परिसरातील गावांची नवीन महापालिका निर्माण करण्याची मागणी होत आहे.
चाकण, आळंदी आणि राजगुरूनगर नगरपरिषद तसेच त्यांच्या परिसरालगतच्या गावांचा समावेश करून नवीन स्वतंत्र महापालिका करण्याचा विचार सध्या सुरू आहे. त्यासाठी चाकण नगरपरिषद, आळंदी नगरपरिषद व राजगुरू नगरपरिषद तसेच त्यांच्या लगतच्या परिसरातील आसपासच्या गावांचे एकूण क्षेत्रफळ, लोकसंख्या, हद्द याबाबतचा तपशिल घ्यावा. तिन्ही नगरपरिषदेतील हद्दीची एक स्वतंत्र महापालिका स्थापन करण्याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त, पिंपरी-चिंचवड, पुणे महापालिका आयुक्त आणि चाकण, आळंदी, राजगुरू नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांचा अहवाल मागवून घ्यावा आणि अभिप्रायासह शासनाने विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडून अहवाल मागविला आहे.