पुणे : गेल्या वर्षी पावसाने दडी मारली. बहुतांश भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला. त्यामुळे हिवाळ्यातच शहरांमध्ये पाणी टंचाई निर्माण होण्याची भीती निर्माण झाली आहे. शेतकरी दुष्काळाने होरपळत आहेत. पावसाच्या आगमनाची वाट पाहणाऱ्या बळिराजासाठी एक आनंदाची बातमी आहे. प्रशांत महासागरातील उष्ण पाण्याचा प्रवाह असलेल्या ‘एल निनो’चा प्रभाव कमी होणार असल्याने देशात नैॡत्य मोसमी पाऊस चांगला पडेल, अशी अपेक्षा हवामान संस्थांनी व्यक्त केली आहे. हवामान खात्याकडून ‘एल निनो’चे बारकाईने निरीक्षण केले जात आहे.
भारतीय हवामान खात्याचे शास्त्रज्ञ डॉ. डी. शिवानंद पै म्हणाले की, सध्याच्या हवामान स्थितीबाबत निश्चित भाष्य करता येत नाही. कारण, काही हवामान प्रारूपे ‘ला निना’चा अंदाज देत आहेत, तर काही ‘एल निनो’ सामान्य राहील, असेही सांगत आहेत.
२०२३ हे वर्ष सर्वांत उष्ण ठरले. त्या वर्षी ‘एल निनो’ सक्रिय होता. त्याचा थेट परिणाम मॉन्सूनवर झाला. येत्या जूनपर्यंत उष्ण पाण्याच्या प्रवाहाची तीव्रता कमी होऊन तो सामान्य होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या जून ते ऑगस्ट या दरम्यान प्रशांत महासागरातील थंड पाण्याच्या प्रवाह ‘ला निना’ची स्थिती येईल. त्याचा परिणाम होऊन यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत देशात मॉन्सून चांगला राहील, असेही खात्यातर्फे सांगण्यात आले आहे. मात्र, ‘स्प्रिंग प्रेडिक्टेबिलिटी बॅरियर’चा संदर्भ देत हवामान अंदाजात काही प्रमाणात कमी-जास्त होऊ शकते, असा सावधगिरीचा इशाराही देण्यात आला आहे.
‘युनायटेड स्टेट्सच्या नॅशनल ओशनिक अँड ॲटमॉस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशन’ने (एनओएए) गेल्या आठवड्यात दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल-जूनपर्यंत ‘एल निनो’ सामान्य असण्याची शक्यता ७९ टक्के आहे आणि जून-ऑगस्टमध्ये ‘ला निना’ विकसित होण्याची शक्यता ५५ टक्के आहे. युरोपियन युनियनच्या ‘कोपर्निकस क्लायमेट चेंज सर्व्हिस’नेदेखील ‘एल निनो’चा प्रभाव कमी होत आहे, याला पुष्टी दिली आहे.