Gold Silver Price today : पुणे : दिवाळीसाठी बाजारपेठा सजल्या आहेत. खरेदीसाठी सर्वांची एकच लगबग सुरु झाली आहे. साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त साजरा करण्यासाठी विशेषतः महिला वर्गाचा ओढा दागदागिने खरेदीकडे असतो. तर काही जण गुंतवणूक म्हणून सोन्याची खरेदी करतात. सोन्याने उसळी घेतली असली, तरी सोन्याचे आकर्षण असल्यामुळे खरेदीकडे ओढा असतोच. या महिन्यात सोने-चांदीच्या भावात चढउतार दिसून येत आहे. सोने स्वस्त झाले असून, चांदीच्या किमती वाढल्या आहेत.
गेल्या महिन्याच्या शेवटी आणि या महिन्याच्या सुरुवातीला सोने १०२० रुपयांनी उतरले. २ नोव्हेंबर रोजी ११० रुपयांची दरवाढ झाली. ३ नोव्हेंबर रोजी त्यात १०० रुपयांची वाढ झाली. तर ४ नोव्हेंबर रोजी सोने १०० रुपयांनी उतरले. आता २२ कॅरेट सोन्याचा भाव ५६,६५० रुपये प्रति १० ग्रॅम तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ६१,७९० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. तर गेल्या आठवड्यात चांदीमध्ये १२०० रुपयांची घसरण झाली होती. २ नोव्हेंबर रोजी चांदीने ७०० रुपयांची उसळी घेतली आणि नंतर तेवढीच घसरण झाली. ४ नोव्हेंबर रोजी त्यात ९०० रुपयांची वाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव ७५,००० रुपये आहे.
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, २४ कॅरेट सोने ६१,०७५ रुपये, २३ कॅरेट ६०,८३० रुपये, २२ कॅरेट सोने ५५, ९४५ रुपये झाले. १८ कॅरेट ४५,८०६ रुपये, १४ कॅरेट सोने ३५,७२९ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहचले. चांदीत वाढ झाली. एक किलो चांदीचा भाव ७१,७७१ रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care अॅप डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते समोर येईल.