पुणे : देशात गेल्या काही महिन्यांमध्ये सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. तब्बल 73 हजारांपर्यंत सोन्याने उसळी मारली आहे. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. अखेर देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील एनडीए सरकारचा तिसरा अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पातून त्यांनी अनेक मोठं मोठ्या घोषणा केला आहेत.
सर्वसामान्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा असणारा सोनं-चांदीच्या दरातही मोठी कपात या बजेटमधील निर्णयामुळे झाली आहे. पुण्याच्या सराफ बाजारात याचा परिणाम दिसून आला. सोनं खरेदीसाठी दुकानात गर्दी केलेल्या ग्राहकांना 2 तासांतच प्रति तोळा सोन्यामागे 3 हजार रुपयांचा फायदा झाला आहे. त्यामुळे, सोनं खरेदीसाठी आलेल्या या सर्वच ग्राहकांनी बजेटवर समाधान व्यक्त केलं आहे. बजेट जाहीर होताच 3 हजारांनी सोन्याचा दर घटल्याचं रांका ज्वेलर्सच्या फत्तेचंद रांका यांनी सांगितल.
केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थ संकल्पात सोन्याच्या कस्टम ड्युटीमध्ये मोठी कपात केली आहे. सोन्याच्या दरात अवघ्या २ तासात 3 हजार रुपयांची घट झाल्याने ग्राहकांकडून आनंद व्यक्त केला जात आहे. सोन्याच्या दरात होणारी वाढ किंवा कपात ही सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची ठरते. गेल्या काही महिन्यांमध्ये सोन्याच्या दरात सतत वाढ होताना दिसत आहे.
मात्र, आज अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी अर्थसंकल्पात घोषणा करताच सोन्याच्या दरात 2 हजार रुपयांची कपात झाली आहे. त्यामुळे पुणेकरांनी सोन्याच्या दुकानात गर्दी केली आहे. याआधी सोने-चांदीचे सीमा शल्क 15 टक्के होते. आता यामध्ये कपात करून सीमा शुल्क थेट 6 टक्क्यांवर आणले आहे. म्हणजेच सरकारने सीमा शुल्क थेट अर्ध्यापर्यंत कमी केल्याने सोन्याच्या दरात मोठी घट झाली आहे.