भोर (पुणे) : हिरडस (ता. भोर) मावळ भागात बिबट्याने शेळीचा फडशा पाडला. शालुबाई रामभाऊ शिंदे यांच्यासह अन्य सहा ते सात गुराखी जनावरे चारण्यासाठी गेले होते. त्यावेळी बिबट्याने शेळीवर हल्ला केला. यावेळी गुराख्यांनी आरडाओरडा केल्यामुळे बिबट्याने तेथून पळ काढला.
दरम्यान, ग्रामस्थ दिनेश शिंदे यांनी वन विभागाचे वनपाल एस. एल. मुंडे यांच्याशी फोनद्वारे संपर्क करून घडलेली घटना सांगितली. वन विभागाने त्वरित बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी ग्रामस्थांसह हिरडस मावळ खोऱ्यातील नागरिकांकडून होत आहे. दरम्यान, घटनेचा अर्ज वन विभागात द्यावा, पंचनामा करून शेतकऱ्याला योग्य ती भरपाई मिळेल, असे वन विभागाचे वनपाल एस. एल. मुंडे यांनी सांगितले.