पुणे : पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्गाचा नवा आराखडा तयार करण्यात येत आहे. हा रेल्वेमार्ग पुणे-अहिल्यानगर शिर्डी-नाशिक असा असणार आहे. नारायणगाव येथील जीएमआरटी प्रकल्पाला धक्का न लावता किंवा जीएमआरटीचे स्थलांतर केले जाणार नाही. तर, नव्या मार्गाने ही हायस्पीड रेल्वे करण्यात येणार आहे, असे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. पाषाण येथील सी-डॅक संस्थेला रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी भेट दिली. त्यानंतर माध्यमांशी त्यांनी संवाद साधला.
अश्विनी वैष्णव म्हणाले की, पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्गामुळे जीएमआरटी केंद्राच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता संशोधकांनी व्यक्त केली होती. तसेच, स्थानिक नागरिकांनीही भूसंपादनास विरोध दर्शविल्याने हा रेल्वेमार्ग प्रकल्प गेल्या दीड वर्षापासून रखडला आहे. जीएमआरटी प्रकल्प केवळ भारतासाठीच नाही, तर २३ देशांसाठी महत्त्वाचे वैज्ञानिक संशोधन केंद्र आहे. या केंद्राचे स्थलांतर करणे म्हणजे भारतातील सर्वांत शक्तिशाली वैज्ञानिक संशोधन केंद्राची क्षमता कमी करण्यासारखे आहे. प्रस्तावित रेल्वेमार्गामुळे रेडिओ लहरी प्रभावित होऊन संशोधनाला अडचण होईल. त्यामुळे या मार्गाचा
नवीन आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, पुणे रेल्वेस्थानकावर प्रवासी आणि मालवाहतूक तसेच रेल्वेगाड्यांची दुरुस्ती अशा कारणांनी ताण पडत आहे. परिणामी, गाड्यांना विलंब, प्रवाशांना सुविधा न मिळणे अशा तक्रारी येत आहेत. याची दखल घेऊन पुणे रेल्वेस्थानकावरील ताण कमी करण्यासाठी उरुळी कांचन येथे नवीन टर्मिनल उभारण्यात येणार आहे. त्या ठिकाणी रेल्वेगाड्यांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच खडकी टर्मिनल येथील विकासासाठी ३६ कोटी तर हडपसर टर्मिनलच्या विकासासाठी १३६ कोटी खर्च करण्यात येणार आहेत.