पुणे : बोपदेव घाटात तरुणीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपींची माहिती देणाऱ्यास दहा लाख रुपयांचे बक्षीस पुणे पोलिसांकडून जाहीर करण्यात आले आहे. पोलिसांकडून आरोपींचा शोध घेण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) तंत्रज्ञानाची मदत घेण्यात येत आहे.
पोलिसांनी आत्तापर्यंत बोपदेव घाट परिसरात गेलेल्या तीन हजार मोबाइलधारकांची माहिती गोळा केली आहे. तसेच सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात येत आहे. दोनशेहून अधिक संशयितांची चौकशी करण्यात आल्याची माहिती पोलिस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी दिली आहे.
नेमकं प्रकरण काय?
बोपदेव घाट परिसरात गुरुवारी (ता. ३) रात्री तरुणी मित्रासोबत फिरायला गेली होती. त्यावेळी तीन आरोपींनी तरुणीसह तिच्या मित्राला कोयत्याचा धाक दाखवत बांबूने मारहाण केली. त्यानंतर आरोपींनी त्या तरुणाला बांधून ठेवत तरुणीवर सामूहिक अत्याचार केला. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेसह तपास पथकांकडून आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.
आरोपींची माहिती देणाऱ्यास दहा लाख रुपयांचे बक्षीस..
आरोपींची माहिती देणाऱ्यास दहा लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार आहे. या घटनेच्या कालावधीत बोपदेव घाटमार्गे प्रवास केलेल्या तीन हजार मोबाइलधारकांची माहिती आणि सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी गोळा केले आहे. या सर्व माहितीद्वारे ‘एआय’ तंत्रज्ञानाच्या मदतीने तांत्रिक विश्लेषण करण्यात येत आहे.