उरुळी कांचन, (पुणे) : सध्याच्या परिस्थितीत मध्ये स्वतःच्या आरोग्याकडे निश्चितच दुर्लक्ष होत असल्याने सर्वानी आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे. वेळेस आहार घ्यावा व नित्यनेमाने व्यायाम करावा, मन प्रसन्न राहण्यासाठी घरात किंवा मंदिरात परमेश्वराचे नामस्मरण करण्यासाठी थोडा तरी वेळ द्यावा, असे मत श्रीकृष्ण आध्यात्मिक प्रतिष्ठाणचे मुख्य विश्वस्त पपु महंत विद्याधर बाबा शहापूरकर यांनी केले.
कोरेगाव मुळ (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील श्रीकृष्ण मंदिराचे मुख्य संचालक तथा श्रीकृष्ण आध्यात्मिक प्रतिष्ठाणचे मुख्य विश्वस्त पपु महंत विद्याधर बाबा शहापूरकर यांच्या वाढदिवसानिमित्त सीए प्रदिप नानासाहेब जगताप व रिलायबल डायगनोस्टिक लॅब हडपसर अमनोरा यांच्या संयुक्त विद्यमाने सुधृढ नारी मोफत रक्त तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी या शिबीराचे उद्घाटनप्रसंगी शहापुरकर बाबाजी बोलत होते.
यावेळी पपु. अनिलबाबा पुणेकर, श्रीकृष्ण आध्यात्मिक प्रतिष्ठाणचे अध्यक्ष विठ्ठल कोलते, सामाजिक कार्यकर्ते जयसिंग भोसले, तुकाराम ताटे, कृषीमित्र विशाल भोसले, संग्राम भोसले, पत्रकार अमोल भोसले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. शिबीरास उस्फुर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सीए प्रदिप जगताप यांनी केले, सूत्रसंचालन प्रतिष्ठाणचे अध्यक्ष विठ्ठल कोलते यांनी व आभार विशाल भोसले यांनी मानले.