पुणे : काँग्रेसच्या नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडियाच्या (NSUI) अध्यक्षाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चतु:श्रुंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अक्षय कांबळे असे या आरोपीचे नाव आहे.
पुणे विद्यापीठ एन्.एस्.यु.आय. अध्यक्ष अक्षय कांबळे याने अनेक विद्यार्थिनींना संदेश पाठवून त्रास दिला आहे. त्याने नुकतेच एका विद्यार्थिनीला केलेल्या संदेशामुळे तिला प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला. संबंधित विद्यार्थिनीने या सर्व घटनेची पोलिसांमध्ये तक्रार केली असता पोलीस प्रशासनाने या विद्यार्थ्यावर विनयभंग आणि विद्यार्थिनीला छळ केल्याचे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुरुवातील पिडीत मुलीने या प्रकाराबाबत कोणालाही माहिती दिली नव्हती. मात्र, मेसेज आणि त्रास वाढत असल्याने या मुलीने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या तक्रारीवरुन अक्षय कांबळेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित विद्यार्थ्यावर विद्यापीठ प्रशासनानेही कारवाई करावी, असे निवेदन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून पुणे सचिवांना देण्यात आले आहे.
संघटनेचे गुंड आणून मला धमकावले : पिडीत तरुणी
अक्षय कांबळे हा मला दोन महिन्यापासून नाहक त्रास देत आहे. त्याने माझे विद्यापीठातील जगणे मुश्किल केले आहे. त्यामुळे मी वसतीगृहाच्या बाहेर पडत नाही. वसतीगृहाच्या बाहेर पडल्यावर मला त्याची भीती जावणत असते. आज त्याने आपल्या संघटनेचे गुंड आणून मला धमकावण्याचा प्रकार केला. त्यामुळे मला अजून भीती वाटत आहे. विद्यापीठ आणि पोलिसांनी मला सुरक्षा द्यावी.मला प्रचंड मानसिक त्रासांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे विद्यापीठानेदखील आरोपीवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी पिडीत मुलीने केली आहे.