पुणे : शहर आणि परिसरात किरकोळ कारणावरून घडणाऱ्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. पुण्यातील वडगावशेरी परिसरात अशीच एक घटना घडली आहे. महाविद्यालयीन तरुणीचा विनयभंग केल्याने जाब विचारणाऱ्या आईला एका तरुणाने पट्ट्याने मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता, तरुणीवर कर्कटकने हल्ला करून आरोपी पसार झाला.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, शाहीद कलीम शेख (रा. वडगाव शेरी) असे गुन्हा दाखल केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत महाविद्यालयीन तरुणीने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणी वडगाव शेरी भागातून ये-जा करत असताना आरोपी शाहिद तिचा पाठलाग करून तिला त्रास देत होता. तरुणाच्या सततच्या त्रासाला ती कंटाळली होती. त्यानंतर शाहीदने तरुणीची छेड काढली. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या तरुणीने या घटनेची माहिती आईला दिली. तरुणीची आई जाब विचारण्यासाठी वडगाव शेरी येथील दिगंबरनगर भागात गेली. आईने शाहिदकडे जाब विचारला. तेव्हा शाहिदने तरुणीच्या आईला पट्ट्याने जबर मारहाण केली.
दरम्यान, आईला वाचविण्यासाठी तरुणीने शाहिदला प्रतिकार केला. त्यावेळी शाहिदने त्याच्याकडील कर्कटकने तरुणीवर हल्ला केला. तरुणीच्या डोक्यात कर्कटक मारल्याने ती जखमी झाली. त्यानंतर शाहिद तेथून पसार झाला. या घटनेचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक घोरपडे करत आहेत.