कात्रज, (पुणे) : मागील काही दिवसांपासून कात्रज चौकामध्ये अपघाताचे सत्र सुरूच आहे. यामध्ये अनेक नागरिकांना स्वतःचा जीव गमावावा लागला आहे. शहरात सर्वत्र गणेश विसर्जनाची धामधूम सध्या सुरू आहे. अशातच आता शहरातील कात्रज परिसरातून एक आपघाताची घटना समोर आली आहे. ही घटना १७ सप्टेंबर रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास कात्रज चौकामध्ये घडली आहे. या अपघातात मयुरी या २६ वर्षीय तरुणीचा जागेवरच मृत्यू झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, कात्रज चौकामध्ये आज सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास एक तरुणी वेस्पा दुचाकी वरून कात्रज-कोंढवा रोडच्या दिशेने जात होती, त्यावेळी अज्ञात टँकरचा धक्का लागला. या अपघातात मयुरीला स्वतःचा जीव गमवावा लागला आहे. दरम्यान, कात्रज चौकामध्ये उड्डाणपुलाचे काम सुरू आहे.
त्यामुळे काही प्रमाणात वाहतूक देखील संथ गतीने सुरू असताना निदर्शनास येते. तसेच काही वाहन चालक देखील गडबडून जातात. त्यामुळे कात्रज चौकात मोठ्या प्रमाणात अपघात झाल्याचे पाहायला मिळते. हे अपघाताचे सत्र थांबणार कधी? असा प्रश्न आता नागरिकांनी उपस्थित केला आहे. या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणीचा मृतदेह ससून रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत.