पिंपरी : डोक्यावरून टेम्पोचे चाक गेल्याने एका तरुणीचा मृत्यू झाला आहे. हा अपघात शुक्रवारी (दि. १९) वाकड येथे मुंबई-बंगलोर महामार्गावर घडला आहे. अपघातात ऋतुजा मोहन वेताळ (वय २५) असे मृत तरुणीचे नाव आहे. मोहन महादेव वेताळ (वय ६२ रा.चिखली) यांनी या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून टेम्पोचालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मोहन हे त्यांची मुलगी ऋतुजाला बाणेर येथील तिच्या कंपनीत सोडायला जात होते. त्यावेळी महामार्गावर बाणेरकडे जाणाऱ्या मार्गिकेवरील पुलावर आरोपीने त्याच्या ताब्यातील टेम्पो भरधाव वेगाने चालवून फिर्यादी यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. या धडकेत फिर्यादी व त्यांची मुलगी खाली पडले. यात फिर्यादी किरकोळ जखमी झाले. तर त्यांची मुलगी ऋतुजा यांच्या डोक्यावरून चाक गेल्याने तीचा मृत्यू झाला आहे. या अपघातात मोहन वेताळ यांच्या दुचाकीचेही नुकसान झाले. या अपघातानंतर टेम्पोचालक घटनास्थळी न थांबता आणि घटनेची माहिती न देता पळून गेला. या प्रकरणी हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.