पिंपरी : पिंपरी चिंचवड परिसरातील मोशी येथून एक धक्कादायक घटना घडली आहे. उसने दिलेले पैसे परत मागितले म्हणून तरुणीला मानसिक त्रास देत आत्महत्येस प्रवृत्त केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एका व्यक्तीवर एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मोशी येथील आदर्शनगरमध्ये ३१ जुलै रोजी घडली आहे. पायल मच्छिंद्र कोकाटे (वय-१८) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.
याबाबत आई नंदा मच्छिंद्र कोकाटे (वय-४८, रा. मु. पो. बोतार्डे, ता. जुन्नर, जि. पुणे) यांनी याबाबत सोमवारी (दि. ५) एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून राम कोकणे (रा. अजनावळे, ता. जुन्नर, जि. पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या बोतार्डे येथे राहण्यास आहेत. आरोपी राम कोकणे याला फिर्यादी नंदा यांची मुलगी पायल हिने उसने पैसे दिले होते. हे पैसे परत मागितले असता कोकणे याने पैसे देण्यास टाळाटाळ केली. तसेच तिला मानसिक त्रास दिला. या त्रासाला कंटाळून पायलने सध्या राहात असलेल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी भोसरी पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.