पुणे : सीबीआयमधून बोलत असून एका गुन्ह्यात तुमचा सहभाग निष्पन्न होत असल्याचे खोटे सांगून सायबर चोरटयांनी तरुणीची २ लाख २० हजारांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी मगरपट्टा येथे राहणाऱ्या २६ वर्षीय तरुणीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सायबर चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, सायबर चोरट्याने फिर्यादी तरुणीशी संपर्क करत टेलिकॉम विभागातून बोलत असल्याचे सांगून तुमच्या मोबाईल नंबरवर अंधेरी पोलीस ठाण्यात तक्रार प्राप्त झाली आहे.
तुमचा नंबर बंद होणार असल्याचे सांगून तपास अधिकारी फोनवर बोलत असल्याचे सांगितले. यानंतर व्हाट्सॲपवर व्हिडीओ कॉलद्वारे प्रदीप सावंत, राजेश मिश्रा हे सीबीआयमधून बोलत असल्याचे सांगितले. तुमचा आधार कार्ड वरील नंबरवरून तुम्ही नरेश गोयल याच्या संबंधित गुन्ह्यात सहभाग निष्पन्न होत असून त्यासाठी एका बँक खात्यावर २ लाख २० हजार पाठवायला सांगून फसवणूक केल्याचे फियार्देत नमूद केले आहे. पोलीस निरीक्षक (गुन्हे) गित्ते तपास करत आहेत.