पुणे : घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांचे गेल्या १६ महिन्यांचे वेतन थकले आहे. थकीत पगाराची वेळोवेळी मागणी करून देखील अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने संतप्त झालेल्या कामगारांनी अखेर आंदोलनासाठी अनोखा मार्ग निवडला. संतप्त कामगारांनी आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी थेट कारखान्याच्या चिमणीवर धाव घेत आंदोलन केले.
दरम्यान, कामगारांनी कारखान्याच्या चिमणीवरून खाली उतरावे यासाठी घोडगंगा कारखान्याचे विद्यमान संचालक दादा पाटील फराटे, शिरूर तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष बापू काळे, घोडगंगाचे माजी संचालक सुधीर फराटे, भाजपचे जिल्ह्याचे नेते राजेंद्र कोरेकर, भारतीय जनता पार्टी किसन मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुभाष कांडगे, श्रीनिवास घाडगे, शिरूर लोकसभा युवा मोर्चाचे अध्यक्ष एकनाथ शेलार, युवा नेते महेंद्र बिडगर, दूध संघांचे संचालक निखिल तांबे, शिवसेना संघटक वीरेंद्र शेलार, संचालक आत्माराम बाप्पू फराटे, राजेंद्र गारगोटे, पत्रकार भोईटे, पत्रकार संजय गायकवाड, पत्रकार प्रमोल कुसेकर, त्याचप्रमाणे शिरूर पोलीस स्टेशनचे पीआय ज्योतीराम गुंजवटे व त्यांचे सर्व सहकारी, त्याचप्रमाणे अग्निशामक दलाचे जवान व सर्व कारखान्याचे अन्य कामगार विनंती करत आहेत. मात्र, मागण्या मान्य झाल्याशिवाय खाली उतरणार नाही, असा पवित्रा कामगारांनी घेतल्यामुळे आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे.
कामगार चिमणीवर चढून आंदोलन करत असलायाने, या आंदोलनाची पंचक्रोशीत चर्चा होत आहे. ग्रामस्थांनी कारखाना परिसरात गर्दी केली होती.