योगेश शेंडगे
शिक्रापूर: शिरूर तालुक्यातील न्हावरे येथील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या आवारातील भंगारात पडलेल्या केमिकलच्या ड्रममध्ये असलेल्या केमिकलने दुपारी चारच्या सुमारास पेट घेतल्याने आग लागली. त्यामुळे एकच खळबळ उडाली. काही वेळातच त्या आगीचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले. रांजणगाव एमआयडीसी तसेच शिरूर नगर परिषद येथील अग्निशमन दलाच्या गाड्या वेळेत आल्याने व अग्निशमन जवानांनी तत्परता दाखवल्याने आग नियंत्रणात आली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला व कारखान्यातील यंत्रणेचे कोणतेही नुकसान झाले नाही.
न्हावरे येथील रावसाहेब दादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे आवारातील भंगारात पडलेल्या केमिकलच्या ड्रममध्ये असलेल्या केमिकलने भर उन्हात चारच्या सुमारास पेट घेतल्याने आजूबाजूला पडलेल्या मोकळ्या पोत्यांनी तसेच वाळलेल्या गवताने पेट घेतला. काही वेळातच आगीच्या ज्वालामुळे मोठ्या मोठ्या धुरांचे लोट दिसू लागल्याने स्थानिक लोकांनी या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ काढून मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल केल. या आगीची बातमी कळताच आमदार अशोक पवार, अग्निशमन यंत्रणा व पोलीस काही वेळातच कारखान्यात दाखल झाले. आग विझवण्यासाठी रांजणगाव एमआयडीसी तसेच शिरूर नगरपरिषद व वाघोली येथून पीएमआरडीएच्या अग्निशामक दलाच्या गाड्या मदतीसाठी आल्या. घटनास्थळी संचालक, माजी संचालक कार्यकर्ते ,कामगार,सभासद व अनेक नागरिकांनी गर्दी केली होती.