पुणे : खानापूर जवळच्या घेरा सिंहगड गावच्या हद्दीत शनिवारी (दि. १४) मध्यरात्री झालेल्या गोळीबारात एकाचा जागीच मृत्यू झाला असून एक गंभीर जखमी झाला आहे. रोहित ऊर्फ भो-या ढिले असं मृत्यू झालेल्याचे नाव आहे, तर तेजस वाघ (दोन्ही रा. खानापुर, ता. हवेली, जि. पुणे) असं जखमीचे नाव आहे. याप्रकरणी दोन्ही गटांकडून हवेली पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहे. त्यावरून पोलिसांनी दहा जणांना ताब्यात घेतले आहे.
मंगेश उर्फ मुन्ना मोहन दारवटकर (वय २५ वर्षे, रा. कोंडगांव, ता. हवेली, जि. पुणे), वैभव उर्फ सोन्या शिवाजी जागडे (वय २० वर्षे, रा.आंबेड वरची आळी, ता. वेल्हा, जि. पुणे), सिध्देश राजेंद्र पासलकर (वय २५, रा. आंबेड, ता. वेल्हा, जि. पुणे), प्रथमेश उर्फ भावड्या मारूती जावळकर (वय-१८), सुमीत उर्फ दादया किरण सपकाळ (वय-२०), केतन उर्फ दादया नारायण जावळकर (वय २३), वैभव किशोर पवार (वय १८ वर्षे चौघेही रा. खानापूर ता. हवेली जि. पुणे), तेजस चंद्रकांत वाघ (वय २४ वर्षे रा. वरची आळी, खानापुर, ता. हवेली, जि. पुणे) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हवेली पोलीस स्टेशन हद्दीतील घेरा सिंहगड गावाच्या हद्दीत सांबरेवाडी येथे रोहित ढिले आणि तेजस वाघ या दोघांमध्ये काही दिवसापुर्वी भांडण झाले होते. याचाच राग मनात धरून तेजस वाघ याने १४ सप्टेंबर रोजी त्याचे मित्र मंगेश दारवटकर, वैभव जागडे, संग्राम बाळासाहेब वाघ, सिध्देश पासलकर, स्वप्नील चव्हाण, केतन जावळकर, गणेश जावळकर, प्रथमेश जावळकर, तेजस वाघ, सोमनाथ आनंता वाघ, आकाश ऊर्फ दादया अनंता वाघ, सुमीत सपकाळ, वैभव पवार व इतर आरोपींनी बेकायदेशीर गर्दी जमवुन बंदुकीने हवेत फायर करून रोहित ढिले याला लोखंडी रॉड, कोयत्याने अंगावर वार करून त्याचा निर्घृण खुन केला.
या घटनेनंतर सर्व आरोपींची घटनास्थळावरून पळ काढला. याबाबत ओंकार धर्मेंद्र ढिले (रा. खानापुर, ता. हवेली, जि. पुणे) यांनी हवेली पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी बेकायदेशीर जमाव जमवून दहशत निर्माण करून खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
तर दुसऱ्या तक्रारीत म्हटलं आहे कि, १४ सप्टेंबर रोजी रात्री एक वाजण्याच्या सुमारास सांबरेवाडी येथे जुन्या भांडणाच्या रागातून रोहित ऊर्फ भो-या ढिले याने तेजस चंद्रकांत वाघ याला फोनवरून शिवीगाळ करून तुझेत दम असेल तर तु खानापुर चौकात ये अशी धमकी दिली. त्यामुळे तेजस चंद्रकांत वाघ व त्याचे इतर साथीदार खानापुर येथे गेले.
त्यावेळी तेथे रोहित ऊर्फ भो-या ढिले व त्याचे मित्र यश ऊर्फ माम्या जावळकर, विकास ऊर्फ पांडया नारगे, साहिल कोंडके, चेतन ऊर्फ दादया जावळकर, प्रविण सांबरे यांनी सोमनाथ आनंता वाघ, तेजस चंद्रकांत वाघ यांना मारहाण केली. तर चेतन ऊर्फ दादया जावळकर याने बंदुकीमधुन सोमनाथ आनंता वाघ याच्यावर गोळीबार करून खुनाचा प्रयत्न केल्याचे फिर्याद जखमी याचा मामा सुरेश दशरथ तागुंदे याने दिली आहे.
सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, उप विभागीय पोलीस अधिकारी सुनिल कुमार पुजारी यांनी गुन्हयाचा सखोल तपास करून गुन्हा उघडकीस आणण्याच्या सुचना पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, ग्रामीण व पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांना दिल्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा, हवेली पोलीस स्टेशन व वेल्हा पोलीस स्टेशन यांची विशेष पथके तयार करून गुन्ह्यातील निष्पन्न आसीपींचा शोध सुरू केला असता वेगवेगळया ठिकाणावरून गोपनीय बातमीदार व तांत्रिक विश्लेषणाचा वापर करून दोन्ही गुन्ह्यातील दहा आरोपीना तपासाकामी ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.