लोणी काळभोर, ता. १२ : लोणी काळभोर (ता. हवेली) येथील ग्रामदैवत श्रीमंत अंबरनाथाच्या वार्षिक उत्सवानिमित्त १५ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता घटस्थापना होणार असून, आगामी दहा दिवसांच्या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती श्रीमंत अंबरनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष योगेश काळभोर यांनी दिली.
या संदर्भात अधिक माहिती देताना योगेश काळभोर म्हणाले की, लोणी काळभोर (ता.हवेली) येथील ग्रामदैवत श्रीमंत अंबरनाथाची वार्षिक यात्रा चैत्र पोर्णिमेला (हनुमान जयंती) असते. यंदा ही यात्रा मंगळवार (ता.२३) व बुधवार (ता.२४) एप्रिलला आहे. ९ एप्रिल रोजी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर या वार्षिक यात्रेनिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांना सुरूवात झाली. सायंकाळी सर्व भाविक भक्तांच्या उपस्थितीत अंबरनाथ व जोगेश्वरीच्या साखरपुड्याचा कार्यक्रम पार पडला.
सोमवारी (ता.१५) पहाटे ५ वाजता श्रींचा महामस्तकाभिषेक होणार आहे. श्रीमंत अंबरनाथाच्या वार्षिक उत्सवानिमित्त चैत्र नवरात्रातील घटस्थापना सायंकाळी सहा वाजता होणार आहे. बुधवारी (ता. १७) रामनवमीनिमित्त राम मंदिरात सकाळी १० ते १२ दरम्यान हभप दत्तात्रय महाराज काळभोर यांचे कीर्तन होणार आहे.
शुक्रवारी (ता.१९) सायंकाळी ५ वाजता पाचव्या माळेनिमित्त सुवासिनींनी घाणा भरणे व हळद फोडण्याचा कार्यक्रम होणार आहे. रविवारी (ता.२१) सायंकाळी ५ वाजता अंबरनाथ व जोगेश्वरीला हळद लावण्याचा कार्यक्रम होणार आहे. मंगळवारी (ता. २३) हनुमान जयंतीच्या दिवशी अंबरनाथाची महापुजा पहाटे चार वाजता होणार आहे.
प्राचीन ग्रामदैवत अंबरनाथ मंदिरापासून सुरु झालेला पालखी सोहळा संपन्न झाल्यानंतर छबिन्याचा कार्यक्रम रात्री दहा वाजता सुरु होणार आहे. बुधवारी (ता.२४) पहाटे चार वाजता अंबरनाथ व जोगेश्वरी यांचा विवाह सोहळा संपन्न होणार आहे. दुपारी चार वाजता कुस्त्यांचा जंगी आखाडा आयोजित करण्यात आला आहे. येथील कुस्त्यांचा आखाडा कुस्ती शौकिनांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा असतो. या आखाड्यात महाराष्ट्रातील नामवंत मल्लांच्या कुस्त्या होतात. विजेत्यांना जवळपास पंचवीस लाख रुपये रोख बक्षीस म्हणून दिले जातात.
शनिवारी (ता.२५) रात्री दहा वाजता वरात काढण्यात येणार आहे. मध्यरात्री १२ ते ३ या वेळेत मारुती मंदिराजवळ, पहाटे ४ ते ५ या वेळेत जुन्या अंबरनाथ मंदिराजवळ संत एकनाथांचे भराड (कथा) सादर होणार आहे. दरम्यान १५ ते २२ एप्रिल दरम्यान अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाचे कलशपूजन तीर्थक्षेत्र रामदरा शिवालयातील श्री महंत १००८ हेमंतपुरी महाराज यांच्या हस्ते होणार आहे. या अखंड हरिनाम सप्ताहाचे व्यासपीठ हभप विनोद महाराज काळभोर भूषविणार आहेत.
दरम्यान, या सप्ताहात काकड आरती, रामायण, प्रवचन, ब-हाड, मनाचे श्लोक, भजन, हरिपाठ, चौघडा, शिवलिलामृत ग्रंथ पारायण, महिला भजन, हरिजागर आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. अखंड हरिनाम सप्ताहात २२ एप्रिलला रात्री ९ ते ११ दरम्यान हभप विनोद महाराज काळभोर यांचे कीर्तन होणार आहे.
परिसरातील नागरिकांनी या सर्व धार्मिक कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन योगेश काळभोर व ग्रामस्थांनी केले आहे.