पुणे : महागाईत होणाऱ्या वाढीमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त असताना, यामध्ये अजून वाढ होण्याची शक्यता आहे. कारण, आगामी दोन वर्षांत सुमारे ६७ हजार ६४४ कोटी रुपयांची तूट भरपाईपोटी सुमारे ३८ टक्के वीजदरवाढ करण्याची याचिका महावितरणने महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे दाखल केली आहे.
जर या याचिकेला मंजुरी मिळाली तर, बिलात प्रति युनिट २ रुपये ५५ पैशांची वाढ होणार आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
तसेच, दरवाढीच्या प्रमाणात इलेक्ट्रिसिटी ड्युटी रकमेचा अतिरिक्त बोजा ग्राहकांवर पडणार तो वेगळाच आहे. महावितरणने आपल्या याचिकेत ही दरवाढ स्थिर वा मागणी आकार, वीज आकार व वहन आकार या तिन्हीं आकारात वाढ करण्याची मागणी केली.
महावितरण कंपनीकडून करण्यात आलेल्या अशा रेकॉर्डब्रेक दरवाढीची मागणी आयोग स्थापन झाल्यापासून गेल्या २३ वर्षांत प्रथमच करण्यात आलेली आहे.
दरम्यान, महावितरणच्या या भरमसाट दरवाढीच्या मागणीला राज्याच्या कानाकोपर्यातून सर्व वीजग्राहक व विविध औद्योगिक, शेतकरी, रहिवासी व ग्राहक संघटनांनी विरोध करावा आणि प्रचंड प्रमाणात हरकती नोंद कराव्यात, असे जाहीर आवाहन महाराष्ट्र वीजग्राहक संघटनेचे अध्यक्ष आणि वीजतज्ज्ञ प्रताप होगाडे यांनी केले आहे.