पुणे: महागाईमुळे अनेकजण त्रस्त असतानाच पुन्हा एकदा महागाईची झळ सर्वसामान्यांना बसु लागली आहे. ऐन थंडीच्याच दिवसांमध्ये पुणे शहरात अंड्याचे दर वाढले आहेत. थंडीमुळे गावरान अंडी प्रती डझन १४० रुपये, तर इंग्लिश अंड्याचा प्रति डझन दर ९० रुपयांवर पोहोचला आहे.
प्रतिनग अंड्यामध्ये गावरान अंडे १२ रुपये तर, इंग्लिश अंडे साडेसात रुपयांवर पोहोचले आहे. थंडीचा परिणाम असून, केकसाठी मागणी वाढल्यानंतर अंड्याचे दर आणखी वाढण्याचा अंदाज येथील अंडी विक्रेत्यांनी वर्तविला आहे. डिसेंबर महिना सुरू झाल्यानंतर थंडीचे प्रमाण देखील वाढू लागले आहे. गेल्या आठवडाभरापासून थंडीचा जोर चांगलाच वाढला आहे. थंडीच्या दिवसांमध्ये आहारात बदलही होतात. अंडे हे उष्ण पदार्थ असल्याने नाश्त्यात अनेकजण अंड्याचा वापर करतात. तसेच नोव्हेंबर ते फेब्रुवारी या हंगामात ख्रिसमस, नऊ वर्षांचा सण आणि सेलिब्रेशनचे प्रमाण अधिक प्रमाणात वाढते. तसेच या काळात व्यायाम करणारे लोकेदेखील अंड्यांचे सेवन करतात. हा ट्रेंड कायम असल्याने अंड्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही हिवाळ्यात अंड्याचे दर वाढले आहेत.
अंड्याचे दर
अंडी : गावरान (शेकडा ) १११०, डझन १४०, प्रतिनग १२, इंग्लिश (शेकडा) ६६०, डझन ९०, प्रतिनग ७.५०.
बेकरी, घरगुती आणि हॉटेल्समधून अंड्याच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे सध्या शहरात डझनभर इंग्लिश अंड्याचा दर ९० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. महिन्याभरापूर्वी हा दर ७८ ते ८० रुपयांपर्यंत होता. अंड्यांना प्रचंड मागणी वाढल्याने प्रति नगाचा दर आता साडेसात रुपयांवर पोहोचला आहे. तर गावरान अंड्याचा एक डझनाचा दर १४० रुपयांवर पोहोचला आहे. महिनाभरापूर्वी हा दर ८५ ते ९० रुपयांपर्यंत होता. प्रति नगाचा दर तब्बल १२ रुपयांवर पोहोचला आहे.