पुणे: प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलच्या कार अपघात (Gautami Patil Car Accident) प्रकरणात आता नवा (Pune News) व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ अपघाताच्या काही मिनिटांपूर्वीचा असून, पेट्रोल पंपावर गाडी उभी असताना ती कॅमेरात कैद झाली होती. व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे की, गाडीत दोन जण होते आणि त्यापैकी एकजण पेट्रोल पंपावर उतरला होता. गाडी पुढे निघाल्यानंतर रिक्षाचालकाला जोरदार धडक लागली होती, ज्यामुळे रिक्षाचालक गंभीररीत्या जखमी झाला. या घटनेमुळे परिसरात प्रचंड गदारोळ झाला.

वडगाव बुद्रुक परिसरातील या अपघाताच्या चौकशीसाठी गौतमी पाटीलला पोलिसांनी नोटीस बजावली आहे. या प्रकरणात मंत्री चंद्रकांत पाटील यांनी थेट डीसीपींना कॉल करून कारवाई करण्याबाबत दबाव टाकल्याची टीकाही समोर येत आहे.

गौतमी पाटीलच्या गाडीला झालेल्या अपघाताची सखोल चौकशी करण्यासाठी पुणे पोलिसांनी विशेष अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणात पोलिसांचा उद्देश केवळ अपघात का झाला हे समजून घेणे नाही, तर त्यामागे काही अन्य कारण होते की नाही, याचा छडा लावणे हा आहे.

चौकशीत अपघातानंतर गाडी बाजूला करण्यासाठी क्रेन कोणाकडून बोलावण्यात आली, त्यासाठी कोणते फोन कॉल झाले आणि त्याचा उद्देश काय होता, याचीही तपासणी केली जाईल. तसेच, अपघाताच्या वेळी गौतमी पाटील वापरत असलेली गाडी भाड्याची होती की अन्य कोणाची, यासंबंधी कागदपत्रे आणि माहिती तपासली जाईल.
पोलिस अपघाताच्या आधी आणि नंतरच्या मार्गावरील सर्व सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी करणार आहेत. यामुळे गाडीचा वेग, अपघाताचे नेमके कारण आणि अपघातानंतर घडलेल्या घटनांचा संपूर्ण क्रम स्पष्ट होईल.
गौतमी पाटीलच्या कार अपघात प्रकरणामुळे पुणे शहरातील वाहतूक सुरक्षेबाबत चर्चा सुरु झाली आहे. पोलिसांच्या या सखोल तपासामुळे अपघाताच्या पार्श्वभूमीवर प्रकाश टाकता येईल आणि भविष्यात अशा दुर्घटनांवर प्रतिबंध घालता येण्यास मदत होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.







