पुणे: पुण्यात नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या (Gautami Patil Car Accident) वाहनाने झालेल्या अपघातात (Gautami Patil Controversy) रिक्षाचालक (Pune News) मरगळे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र, अपघातानंतर आता मरगळे कुटुंब आणि गौतमी पाटील यांच्यात आरोप-प्रत्यारोपांची जोरदार जुंपली आहे.

गौतमी पाटील हिने काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटले की, “मी थेट त्यांच्या संपर्कात नाही. मला इकडून-तिकडून खबरी मिळत आहेत. त्यांचा आकडा ठरलेला नाही. कधी 19 लाख, कधी 20 लाख, आता 10 लाख अशी सतत बदलणारी मागणी ते करत आहेत. माझ्या मानलेल्या भावाकडे त्यांनी पैशांची मागणी केली,” असा दावा तिने केला.

या आरोपांना जखमी रिक्षाचालकाच्या कन्या अपर्णा मरगळे यांनी तीव्र शब्दांत उत्तर दिले आहे. “गौतमी पाटील हिने आमच्या गरिबीची थट्टा केली आहे. तिच्या विधानांमध्ये प्रचंड विसंगती आहे. एकीकडे ती म्हणते आम्ही पैसे मागितले, तर दुसरीकडे म्हणते की कायद्याने जायचे होते. जर आम्ही 19 लाखांची मागणी केलीच होती, तर तिने का नाही दिले? गौतमी आमच्यावर खबरी ठेवते का, असा प्रश्नही उपस्थित होतो. आमच्यावर आलेल्या संकटाची ती चेष्टा करत आहे,” असा संताप अपर्णा मरगळे यांनी व्यक्त केला.
दरम्यान, गौतमी पाटीलने “मी स्वतःही गरिबीतून पुढे आले आहे. मला वेळ असता तर मी नक्की भेटायला गेले असते, पण मी जाणं टाळलं कारण त्याचा उपयोग झाला नसता,” असेही म्हटले होते. या वक्तव्यावरही अपर्णा मरगळे यांनी प्रत्युत्तर दिले. त्या म्हणाल्या, “गौतमी पाटील यांनी आमच्याशी थेट संपर्क केला नाही, ना माणूस म्हणून नैतिकतेचे भान ठेवले. आता त्यांच्याकडून नैतिकतेची अपेक्षाच नाही. मी न्यायासाठी लढत आहे आणि न्याय मिळेपर्यंत आवाज उठवतच राहणार आहे.”
अपघातप्रकरणी दोन्ही बाजूंनी केलेले आरोप-प्रत्यारोप पाहता हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. समाजमाध्यमांवरही या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू असून, गौतमी पाटील यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.







