पुणे : पुण्यातील चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस वाहून नेणाऱ्या टँकरचा भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटामुळे अनेक घरांची पडझड झाली आहे. मोहितेवाडी परिसरात आज रविवारी पहाटे पावणे पाचच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. मात्र, घरांची पडझड झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. यावेळी टँकरच्या स्फोटाचे हादरे एक किलोमीटरपर्यंत बसले.
या घटनेसंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, चाकण-शिक्रापूर मार्गावरील मोहितेवाडी परिसरात ढाबा (हॉटेल) आहे. या ढाब्यावर नेहमीच गर्दी असते. रविवारी पहाटे या ढाब्यासमोर एक गॅस टँकर उभा होता. अचानक या टँकरला आग लागली. क्षणार्धात आगीनं रौद्ररुप धारण केलं. गॅस टँकरचा भीषण स्फोट झाला.
आज सकाळी पावणे पाचच्या सुमारास गॅस रिफिलिंग करणाऱ्या टँकरमधून हा ब्लॉक झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनेत काही सिलेंडरचे स्फोट झाले. या स्फोटाचा मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिक घाबरले. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. सध्या या घटनेचा तपास केला जात आहे.