चाकण : चाकण-शिक्रापूर रस्त्यावरील बहुळच्या (ता. खेड) हद्दीत कापड दुकानदाराला शिवीगाळ, दमदाटी करून जिवे मारण्याच्या उद्देशाने लोखंडी रॉडने व दगडाने प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केल्याचा प्रकार घडला आहे. चाकण पोलिसांनी या प्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. जनार्दन सोमाजी शितोळे (वय ४४ रा. बहुळ, ता. खेड) या कापड दुकानदाराने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शितोळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सचिन आत्माराम पानसरे (रा. बहुळ, ता. खेड) व प्रमोद साबळे (रा.साबळे मळा, बहुळ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चाकण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बहुळ येथे रविवारी (दि.२३) सकाळी साडे अकरा वाजण्याच्या दरम्यान आरोपी सचिन पानसरे व प्रमोद साबळे हे चांदणी चौकात उभे होते. त्यांनी फिर्यादी शितोळे यांना संगनमत करून पांडाशेठ पानसरे यांच्या ढाब्यासमोर नेले. तिथे त्या दोघांनी शितोळे यांना शिविगाळ, दमदाटी करत लोखंडी रॉडने मानेवर, पाठीवर आणि डोक्यात जबर मारहाण करून दगडाने शितोळे यांच्या गाडीच्या काचा फोडून नुकसान केले. वरील दोन्ही आरोपींनी एवढ्यावर न थांबता बहुळ चौकातून चिंचोशी गावच्या हद्दीतील डोंगराच्या माथ्यावर नेऊन शितोळे यांना गाडीच्या खाली उतरून लाथाबुक्याने जबर मारहाण केली. यावेळी प्रमोद साबळे याने गाडीच्या ड्राव्हरमधून जबरदस्तीने चार लाख ऐंशी हजार रुपये काढून घेतले. तू जर पोलिसांत तक्रार केली जीवे मारण्याची धमकी दिली.