बारामती : बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जळोची भाजी मार्केटमध्ये लसणाला उच्चांकी २८० रुपये प्रति किलोस भाव मिळाला. लसणाला सरासरी २२० रुपये प्रति किलो भाव मिळत आहे. त्याचप्रमाणे शेवग्याचे भावही तेजीत असून शेवग्याला प्रति किलो कमाल २५० रुपये व सरासरी २०० रुपये असा उच्चांकी दर मिळत आहे. त्याचप्रमाणे गवार, वांगी, मिरची, भेंडी, वाटाणा, दोडका, गाजर, दुधी भोपळा, कारले व इतर फळभाज्या व पालेभाज्यांना चांगले दर मिळत आहेत. थंडीचा कडाका वाढल्याने बाजारात आवक कमी होत असल्याने भाजीपाल्याचे बाजारभाव वाढले असल्याची माहिती सचिव अरविंद जगताप यांनी दिली.
बारामती बाजार समितीने जळोची भाजी मार्केट आवारात शेतकरी व व्यापाऱ्यांना विविध सुविधांबरोबर सेलहॉलची उभारणी केल्याने शेतामालाचे ऊन, वारा, पावसापासून संरक्षण होत आहे. तसेच शेतमालाला कटती नाही. कुठलीही सूट नसल्याने बारामतीसह आसपासच्या तालुक्यांतून फळे, भाजीपाल्याची आवक होत आहे. आवारात फळे व भाजीपाला उघड लिलावाने खरेदी-विक्रीची सोय असल्याने बाहेरील खरेदीदार येत असून, शेतकऱ्यांनी आपला शेतमाल बाजार आवारातच विक्री करावा, असे आवाहन बारामती बाजार समितीतर्फे करण्यात येत आहे.