नागपूर : राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. या अधिवेशनात मराठा आणि धनगर आरक्षणाचा मुद्दा सभागृहात गाजण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारला घेरण्याची रणनीती विरोधकांनी आखली आहे. अशातच हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विरोधक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. विरोधकांकडून विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन सुरु करण्यात आले आहे. गळ्यात संत्र्यांची माळ घालत आणि हातात निषेधाचे बॅनर्स घेत विरोधी पक्षातील नेते विधीमंडळ परिसरात पोहोचले असून, शिंदे सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत, त्यांनी शिंदे सरकारचा निषेध केला.
गारपिटीमुळे राज्यात सुमारे सव्वा पाच लाख हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. याप्रश्नी शेतकऱ्यांना मदत करण्याचे संकेत देऊन सरकारने विरोधी पक्षाची कोंडी करण्याचे प्रयत्न केले आहेत. मात्र, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारला घेरण्याची रणनीती विरोधकांनी आखली आहे. नागपुरात विधीमंडळ परिसरात विरोधकांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. शेतकरी झाला कासावीस, खोके सरकार ४२०!, बळीराजा अवकाळीने ग्रस्त, सरकार मात्र जाहिरातीत व्यस्त, खोके सरकारचा धिक्कार असो, शेतकरी विरोधी सरकारचा धिक्कार असो, अशी घोषणाबाजी विरोधकांनी केली.
या वेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारच्या कामकाजावर टीका केली. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे. सरकारची मदत नाही, कापसाला, सोयाबीनला योग्य भाव मिळत नाही. सरकार शेतकऱ्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे. सरकारने कर्जमाफी केलीच पाहिजे, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली.
दरम्यान, या सरकारचे नागपुरातील हे शेवटचे अधिवेशन आहे. त्यामुळे पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने वातावरण तयार करण्याचा प्रयत्न सरकारकडून करण्यात येत आहे.
हिवाळी अधिवेशनातील विधेयके
– महाराष्ट्र गोजातीय प्रजनन विधेयक
– महाराष्ट्र शेतजमीन जमीनधारणेची कमाल मर्यादा सुधारणा विधेयक.
– आलाई विद्यापीठ विधेयक
– विद्यापीठांच्या नावातही बदल करणारे महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक
– ऑनलाइन गेम, अश्वशर्यती, कॅसिनोबाबत विधेयक
– चिटफंड घोटाळ्यासंबंधी विधेयक
– बोगस बी-बियाण्यांसंबंधी विधेयक