पुणे : नागरिकांना कोजागरी पौर्णिमेचा आनंद घेता यावा, यासाठी पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमधील सर्व उद्याने ही बुधवार म्हणजेच १६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४.३० ते १२ वाजेपर्यंत खुली राहणार आहेत. एरव्ही ही उद्याने रात्री आठ वाजेपर्यंत खुली राहतात. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९चे कलम ६६ (१०) अन्वये सार्वजनिक उद्याने, बागा मनोरंजनासाठी मोकळ्या जागांची तरतूद करणे, नागरिकांच्या मंनोरंजनासाठी उद्याने/बागा उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे.
पुणे महानगरपालिका अधिकारी क्षेत्रामध्ये एकूण १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीअंतर्गत उद्यान विभागामार्फत एकूण २११ उद्याने, मत्स्यालय व प्राणिसंग्रहालय आहेत. उद्यानांचे विकसन, सुशोभीकरण, देखभाल, देखरेख व दुरुस्तीविषयक कामे उद्यान विभागामार्फत करण्यात येतात. या उद्यानांमध्ये नागरिक, लहान मुले, परदेशी नागरिक मोठ्या प्रमाणावर भेट देत असतात.