लोणी काळभोर : लोणी काळभोर व कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग १० दिवस उलटल्यानंतरही जैसे थे असल्याचा प्रकार आज मंगळवारी (ता.८) उघडकीस आला आहे. यामुळे दोन्ही ग्रामपंचायतींचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. तर ग्रामपंचायत प्रशासनाला जाग कधी येणार? त्यांना नागरिकांच्या आरोग्याचे काही देणे घेणे आहे की नाही? असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
कदमवाकवस्ती व लोणी काळभोर गावातील कचरा उचलण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाच्या काही गाड्या कार्यरत आहेत. मात्र, तरीही लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील अंबरनाथ मंदिराजवळ, आठवडे बाजारात व ओढ्यालगत कचरा पडलेला आहे. त्यामुळे या गाड्यांचा दोन्ही ग्रामपंचायतींनी केवळ दिखावा केल्याचे दिसून येत आहे.
कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत एमआयटी कॉर्नर, लोणी स्टेशन व घोरपडे वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर दुर्गंधीयुक्त कचरा साठलेला आहे. या कचऱ्यात प्लास्टिक मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. त्यामुळे या दोन्ही गावांच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या दोन्ही ग्रामपंचायती कचरा व्यवस्थापन करण्यास सपशेल अपयशी ठरल्याचे दिरून येत आहे.
दरम्यान, ‘कदमवाकवस्ती व लोणी काळभोर हद्दीत कचऱ्याचे साम्राज्य’ या मथळ्याखाली ‘पुणे प्राईम न्यूज’ने गुरुवारी (ता.4) बातमी प्रसिद्ध करून आवाज उठविण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा दोन्ही ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवकांनी कचरा त्वरित उचलून घेतो, अशी पुढाऱ्यांसारखी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली होती. मात्र, ती प्रतिक्रिया केवळ बोलण्यापुरतीच मर्यादित होती, असे दिसून आले आहे. लोणी काळभोर गावात तर काही स्वयंघोषित पुढाऱ्यांनी प्रतिक्रिया का दिली? म्हणून तोंड दाबण्याच्या प्रयत्न केला आहे.
लाडकी बहिण योजनेचे पैसे आजारपणात; मुख्यमंत्र्याची बहिण दिवाळीत दवाखान्यात
नागरिक दरवर्षी कर भरतात. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सेवा देणे हे त्यांचे कर्त्यव्य आहे. मात्र, दोन्ही गावांत मोठ्या प्रमाणात कचरा साठलेला आहे. सध्या परिसरात दुर्गंधी पसरलेली आहे. वातावरण रोगट झाले आहे. घरोघरी चिकनगुनिया, डेंगी व मलेरियाचे दोन ते तीन रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे लाडकी बहिण योजनेचे पैसे आजारपणात आणि मुख्यमंत्र्याची बहिण दिवाळीत दवाखान्यात, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. याला प्रशासन सर्वस्वी जबाबदार आहे.
-रमेश भोसले (जिल्हा संघटक – शिवसेना उबाठा)कदमवाकवस्ती येथील कचरा उचलण्याचे काम सुरु आहे. राहिलेल्या ठिकाणाचा कचरा उचलण्यास स्वच्छता कर्मचाऱ्यांना सांगितले आहे. लवकरच सर्व परिसर कचरामुक्त होईल.
-अमोल घोळवे (ग्रामविकास अधिकारी, लोणी काळभोर)
कचरा उचलण्यासाठी कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. कर्मचारी कचरा उचलून घेतील. नागरिकांना वारंवार सांगूनही कचरा रस्त्यावर टाकत आहेत. नागरिक ज्या ठिकाणी कचरा टाकत आहेत, त्या ठिकाणी कचरा टाकू नये, यासाठी लवकरच फ्लेक्स बसविण्यात येतील.
– सतीश गवारी (ग्रामसेवक, लोणी काळभोर, ता. हवेली)