पुणे : दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने एका व्यक्तीने तरुणावर जीवघेणा हल्ला केल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे. कचरा वेचक तरुणाच्या गळ्यावर कटरने वार केलेल्या एका व्यक्तीस फरासखाना पोलीसांनी अटक केली आहे. ही घटना लक्ष्मी रस्त्यावरील विजय मारुती चौकात घडली आहे.
गंभीर जखमी झालेल्याचे नाव धमेंद्र नरेशचंद्र यादव (वय 26 रा. कॉंग्रेस भवनजवळील पदपथ, शिवाजीनगर) आहे. याप्रकरणी अर्जुन पदम थापा (वय-30, सध्या रा. डांबर गल्ली, बुधवार पेठ, मूळ रा. बीरता मठ, काठमांडू, नेपाळ) या व्यक्तीस अटक करण्यात आली आहे.
या घटनेबाबत यादव यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यादव हा व्यक्ती कचरा वेचक आहे. सोमवारी मध्यरात्री बाराच्या दरम्यान लक्ष्मी रस्त्यावरील विजय मारुती चौकात कचरा वेचण्याचे काम करत होते. त्यावेळी आरोपी अर्जुन थापा तेथे आला. त्यावेळी त्याने यादव याच्याकडे दारु पिण्यास पैसे मागतिले.
त्यादरम्यान यादव याने त्याला पैसे देण्यास नकार दिला. पैसे देण्यास नकार दिल्यामुळे आरोपी अर्जुन थापाने खिशातील कटर काढून त्याच्या गळ्यावर वार केले. यावेळी यादव गंभीर जखमी झाले. तात्काळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दाढे करत आहेत.