पुणे : शारदीय नवरात्रीला सुरूवात झाली आहे. नवरात्रोत्सवात उत्साह आणि जल्लोषात गरबा, दांडिया खेळला जातो. कित्येक तरुण- तरुणी आवडीने यात सहभागी होतात. मात्र, याच आनंदाच्या वातावरणात एका कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. शहरातील चाकण येथे गरबा कार्यक्रमावेळी पुण्यात प्रसिद्ध गरबा कलाकार अशोक माळी यांचा गरबा खेळताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. त्यांच्या मुलासोबत गरबा खेळता खेळताच अचानक भोवळ आली आणि ते खाली कोसळले.
पुण्यातील प्रसिद्ध गरबा किंग म्हणून अशोक माळी यांची ओळख आहे. ते गेल्या चार- पाच वर्षापासून गरबा प्रशिक्षक म्हणून काम करतात. नवरात्रीमध्ये वेगवेगळ्या मंडळांकडून त्यांना आमंत्रण असते. यंदा देखील चाकणमधील एका ठिकाणी गरबा खेळण्यासाठी गेले होते. अशोक माळी यांच्यासोबत त्यांचा मुलगा भावेश देखील गेला होता. दोघे गरबा खेळताना त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर तात्काळ त्यांना वैद्यकीय मदत मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले परंतु दुर्दैवाने त्यांना मृत घोषित केले.
संबंधित घटनेचा व्हिडीओ मनाला चटका लावणारा आहे. या व्हिडीओमध्ये अशोक माळी ‘घुंगट मे चाँद होगा, आखो मे सजनी… या गाण्यावर आनंदाने आपल्या लेकासोबत गरबा खेळत होते. गरबा खेळताना अचानक ते जमिनीवर कोसळले. अशोक माळी यांच्या मृत्यूची घटना कॅमे-यात कैद झाली असून या दुर्दैवी क्षणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.