पुणे : पुण्यातील जनता वसाहत परिसरात किरकोळ कारणातून एका अल्पवयीन तरूणासह तिघांनी दहशत माजवत वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. या घटनेत चारचाकी, रिक्षा, दुचाकींसह ६ ते ७ वाहनांचे नूकसान झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. तर, अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. शुक्रवारी मध्यरात्री साडेतीन वाजण्याच्या सुमारास जनता वसाहत भागात ही घटना घडली आहे.
याबाबत संजय जाधव (वय-५१, रा. जनता वसाहत, पुणे) यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून पोलिसांनी शंतनू जगताप, पियूष गाकवाड यांना अटक केली आहे. यातील ताब्यात घेतलेला अल्पवयीन रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, शंतनू तसेच इतर आरोपी जनता वसाहत मध्ये राहण्यास आहेत. त्यांची याच भागातील काही मुलांसोबत भांडण झाले होते. याचाच राग आरोपींच्या मनात होता. दरम्यान, शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास त्यांनी जनता वसाहतीत येऊन गोंधळ घालण्यास सुरुवात केली. तसेच तेथेच पडलेल्या दांडक्याने आणि दगडाने पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड करून नुकसान केले. यामध्ये तीन रिक्षा, एक व्हॅन, एक कार आणि काही दुचाकींचा समावेश आहे.
दरम्यान, त्यांनी त्यांच्या व्हॅनच्या झालेल्या नूकसानीबाबत जाब विचारला असता आरोपींनी त्यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. यावेळी मध्ये आलेल्या त्यांच्या भावाला देखील मारहाण केली. ‘आम्ही इथले भाई आहोत, आमच्या नादाला लागू नका’, असं म्हणून आरोपींनी परिसरात दहशत पसरविली. त्यानंतर आरोपींची घटनास्थळावरून पळ काढला.
या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांच्याह पथकाने घटनास्थळी धाव घेत घेतली. याप्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केली असून अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. पर्वती पोलीस पुढील तपास करत आहेत.