पुणे : आंबेगाव तालुक्याच्या पुर्वभागातील पारगाव कारखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील दोन अल्पवयीन मावस बहिणीवर चार जणांनी मिळून सामूहिक बलात्कार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपींनी मुलींवर अत्याचार केल्याचा व्हिडिओ काढून तो व्हिडिओ दुसऱ्याला दिला. तसेच त्यातील एका अल्पवयीन मुलीला तो व्हिडिओ दाखवून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. याप्रकरणी दोन अल्पवयीन मुलांसह इतर तिघाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पीडित मुलीच्या आईने पारगाव कारखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी अवधूत राजू पंचरास, कुणाल कैलास बोराडे , महेश शुभम तांबे तसेच दोन अल्पवयीन मुले यांच्या विरोधात बलात्कार तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन अल्पवयीन सख्ख्या मावस बहिणीवर सामूहिक बलात्कार करून अत्याचार करण्यात आला आहे. दोन्ही अल्पवयीन मुली घरी एकट्याच होत्या. त्यावेळी दोन अल्पवयीन मुले तसेच अवधूत पंचरास, कुणाल बोराडे हे घरी आले. त्यांनी या दोन्ही बहिणीवर बलात्कार केला. सदर अल्पवयीन मुलींनी विरोध केला असता त्यांना हाताने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली.
बलात्काराचे व्हिडिओ शुटिंग केले
अल्पवयीन मुलगा बलात्कार करत असताना कुणाल बोराडे याने मोबाईल मधून घराबाहेरच्या खिडकीतून शूटिंग केले. महेश तांबे याने एका पीडीतेला सदर व्हिडिओ दाखवून दुसऱ्या पीडीतेला पुलाजवळ पाठवून दे असे सांगितले व तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी पाच आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
माहिती तंत्रज्ञान अधिनियमच्या कलमाखालीही गुन्हा दाखल झाला आहे. यातील अल्पवयीन मुलांना बाल सुधार गृहात पाठवण्यात आले आहे. तर अवधूत पंचराज, कुणाल बोराडे व महेश तांबे यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अरुण फुगे करत आहेत.