हडपसर, (पुणे) : हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गणेशोत्सवादरम्यान पश्चिम बंगाल, उत्तरप्रदेश आणि झारखंड राज्यातून येऊन मोबाईल चोरी करणाऱ्या ५ जणांच्या टोळीला हडपसर पोलिसांच्या तपास पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून २० मोबाईल जप्त करण्यात आले.
मुना रावत (वय २१ रा. बंगला बाजार, चारबाग रेल्वेस्टेशन जवळ, लखनौ, उत्तरप्रदेश), मंतोषसिंग सिंह (वय २२), जोगेश्वर कुमार रतन महतो ऊर्फ नौनीया ग्रुप (वय ३०), सुरज रामलाल महातो (वय ३०, सर्व रा. बाबूपुर, तिनपहार रेल्वेस्टेशनजवळ, सावरगंज, झारखंड) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यामध्ये एक विधीसंघर्षित बालकाचाही समावेश आहे. त्यांच्याकडून ३ लाख ८० हजार रुपये किमतीचे २० मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेशोत्सव साजरा होत असताना हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये वाढत आहे. त्यानुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके यांनी तपास पथकाला योग्य त्या सूचना देऊन आरोपींना पकडण्याचे सांगितले. त्यानुसार, तपास पथक हडपसर भाजी मंडई भागात गस्त घालत असताना तपास पथकातील अंमलदार प्रशांत टोणपे व अजित मदने यांना गोपनीय माहिती मिळाली की, मोबाईलचोरी करणारे संशयित हे गांधी चौक येथे थांबले आहेत. त्यानुसार, तपास पथकाच्या पोलिसांनी सापळा रचून या आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक तपास केला असता त्यांच्याकडे २० मोबाईल मिळून आले.
या आरोपींकडे अधिक चौकशी केली असता पुणे शहरातील हडपसर, बंडगार्डन, स्वारगेट, फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल चोरी केली असल्याचे सांगितले. हडपसर तपास पथकाने आरोपींकडून हडपसर पोलीस ठाण्यातील ४ गुन्हे उघडकीस आणले आहेत.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके, पोलीस निरीक्षक गुन्हे विश्वास डगळे, पोलीस निरीक्षक संदीप शिवले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश शिंदे, पोलीस अंमलदार सुशील लोणकर, संदीप राठोड, समोर पांडुळे, सचिन जाधव, शाहीर शेख, प्रशांत दुधाळ, निखिल पवार, अतुल पंधरकर, भगवान बडे, अनिरुद्ध सोनवणे, सचिन गोरखे, प्रशांत टोपे, अजित मदने, चंद्रकांत रेनीतवाड, मनोज सुरवसे, अमोल दणके, कुंडलिक फेसकर, रशिद शेख, पोलीस मित्र अविनाश ढगे, शुभम खाडे, कावेरी फाळके, पुनम काळे, प्रतिक माने यांचे पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस नाईक अंकुश बनसुडे करत आहेत.