केडगाव : अनेक ठिकाणी डीजे, साऊंड सिस्टीम, तसेच ढोलताशांच्या गजरात गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या… च्या जयघोष करीत उत्साहात गणरायाला निरोप देण्यात आला. परंतु खुटबाव (ता. दौंड) येथील हनुमान तरूण मंडळ (शेलार वस्ती) तब्बल चार वर्षापासून गुलाल मुक्त व डिजे विरहित पारंपरिक पद्धतीने गणेशाला निरोप देतात.
यावर्षी देखील आळंदी येथील वारकरी संस्थेतील 100 हून अधिक मुलांना आमंत्रित करून टाळ मृदुंगाच्या गजरात गणरायाची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुक उत्सवात प्रत्येक कुटुंबात आनंदाला उधाण आले. व गणपतीचे सानिध्य सर्वांना हवेहवेसे वाटले. यामध्ये अनेक अबाल वृद्ध तसेच महिला भगिनींनी फुगडी चा ठेका धरत आपला आनंद व्यक्त केला. जवळपास 1960 सालापासून ते आजतागायत गणरायाच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंत हे मंडळ किर्तन, भारुड, भजन, सुवाहसिनींचे हळदी-कुंकू, कौंटुंबिक सोहळे साजरे करून समाजापुढे एक आदर्श निर्माण करत आहेत. यामुळे तरुण पिढीला एक अध्यात्माची ओढ लागवी हे त्यांचे खास वैशिष्ट्य आहे.
तसेच परिसरातील सर्वांना अन्नदान देखील केले जाते. अशा या प्रदूषण विरहित मिरवणूक काढल्याने खर्च देखील खूप कमी लागतो व प्रदूषण टाळणे ही एक सामाजिक बांधिलकी असल्याचे या मंडळाने यावेळी सांगितले. तसेच येत्या पंधरा दिवसांमध्ये तरुणांमध्ये एक आदर्श निर्माण व्हावा, यासाठी प्रसिद्ध व्याख्याते वसंत हंकारे यांचे व्याख्यान ठेवणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.