पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळ याचा खून करणारे विठ्ठल शेलार आणि गणेश मारणे हे दोन मुख्य सूत्रधार आहेत. शेलार आणि मारणे यांनी मोहोळच्या खुनाचा कट रचल्याची माहिती गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी मंगळवारी न्यायालयात दिली आहे. शरद मोहोळ खून प्रकरणात विठ्ठल महादेव शेलार (वय ३६), रामदास उर्फ वाघ्या नानासाहेब मारणे (वय ३६, दोघेही रा. मुळाशी) यांना अटक करून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बिराजदार यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले.
शेलार आणि मारणे यांना पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बिराजदार यांनी दिले. मोहोळ खून प्रकरणाचा मुख्य सूत्रधार गणेश मारणे पसार झाला असून त्याच्या मागावर पोलिसांची पथके आहेत, अशी माहिती न्यायालयात देण्यात आली आहे.
साहिल उर्फ मुन्ना पोळेकर आणि साथीदारांनी पाच जानेवारी रोजी मोहोळचा कोथरुडमधील सुतारदरा परिसरात पिस्तुलातून गोळ्या झाडून खून केला होता. याप्रकरणात आतापर्यंत १५ आरोपीना अटक करण्यात आली आहे, तसेच आठ ते नऊजणांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी करण्यात येत आहे.
खूनापूर्वी शेलार आणि मारणे यांची बैठक
मोहोळचा खूनापूर्वी विठ्ठल शेलार आणि गणेश मारणे यांची बैठक झाली होती. शेलारविरुद्ध खून, खंडणी, अपहरण असे गंभीर स्वरुपाचे १७ गुन्हे दाखल आहेत. वाघ्या मारणे सराइत गुन्हेगार आहे. शेलार आणि मारणे कोठे भेटले, त्यावेळी कोण उपस्थित होते, यादृष्टीने तपास करायचा आहे, असे तपासअधिकारी सहायक पोलीस आयुक्त सुनील तांबे यांनी सांगितले.