पुणे : पुणे-सोलापूर रस्त्यावरील लोणी काळभोर परिसरात फर्निचरच्या गोदामाला आग लागण्याची घटना गुरुवारी (ता. १४) सकाळी घडली. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, लोणी काळभोर भागातील बोरकर वस्ती येथील सुरक्षा डोअर गोदामात लाकडी सामान ठेवण्यात आले आहे. गुरुवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास या गोदामाला आग लागली. गोदामात लाकडी साहित्य असल्याने तत्काळ आग भडकली. परिसरात मोठ्या प्रमाणावर धूर झाला होता. दरम्यान, प्रसंगावधान राखत जवानांनी पाण्याचा मारा करून अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली.
आगीच्या घटनेनंतर गोदामाची पाहणी जवानांनी केली. गोदामात कोणी नसल्याची खात्री जवानांनी केली. लोणी काळभोर, हडपसर-सासवड रस्त्यावर ऊरळी देवाची परिसरात अनेक कंपन्यांची गोदामे आहेत. गोदामात आग लागल्याच्या घटना या भागात सातत्याने घडत असतात. खडकमाळ आळीत क्रीडा चषक निर्मिती करणाऱ्या कारखान्यात बुधवारी रात्री आग लागल्याची घटना घडली होती. रस्ते खोदाईमुळे अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पोहचण्यास विलंब झाला. जवानांनी पाण्याचा मारा करून अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली.