दीपक खिलारे
इंदापूर : राज्यात शिवसेना – भाजप या पक्षाचे जनतेच्या हिताचे डबल इंजिन असलेले आपले सरकार असून या सरकारच्या माध्यमातून इंदापूर शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नसल्याची ग्वाही हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
इंदापूर शहराच्या विकासासाठी शिवसेना-भाजप युती सरकारकडून सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना सन २०२२-२३ महाराष्ट्र नगरोत्थान अभियान या योजनेतून रु.१० कोटींचा निधी मंजूर करण्यात आल्याबद्दल माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा इंदापूर शहराच्या वतीने इंदापूर अर्बन बँकमध्ये भव्य जाहीर सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना हर्षवर्धन पाटील बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, इंदापूर शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहे. शासनाच्या सर्व योजना नागरिकांसाठी प्रभावीपणे राबविण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
यावेळी इंदापूर शहरासाठी निधी मंजूर केलेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे हर्षवर्धन पाटील यांनी आभार व्यक्त केले.
यावेळी इंदापूर शहरवासीय तसेच पतंजली योग समिती, रत्नप्रभा हाऊसिंग सोसायटी, महतीनगर यांच्यावतीने माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. माजी नगराध्यक्ष अशोक इजगुडे, गटनेते नगरसेवक कैलास कदम, जयकुमार शिंदे , दत्तात्रेय अनपट , विशाल बोंद्रे , प्रा.सुनील सावंत यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमास नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रामराजे कापरे, भागवत गटकुळ ,माजी नगरसेवक शेखर पाटील, रघुनाथ राऊत, नगरसेवक जगदीश मोहिते, माजी नगरसेवक पांडुरंग शिंदे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंदापूर शहर भाजपचे शहराध्यक्ष शकील सय्यद यांनी केले तर आभार स्वप्निल सावंत यांनी मानले.