उरुळी कांचन, (पुणे) : विधानसभा मतदारसंघात दिवंगत माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांनी विकासकामांचा संकल्प केला होता.
त्यासाठी त्यांनी वाघोली ते शिरुर दरम्यान उड्डानपूल, वाहतुक कोंडी फोडण्यासाठी बायपास रस्ते तसेच शिरुर-हवेली तालुक्याला जोडणाऱ्या महत्वकांक्षी पाबळ, तळेगाव, उरुळी कांचन, शिंदवणे राज्य मार्गांची उर्वरीत प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावून बाबुराव पाचर्णे यांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण करावे, अशी मागणी भाजप शिष्टमंडळाने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे.
वाहतूक कोंडी आणि वाढत्या वाहतुकीच्या पार्श्वभूमिवर शिरूर- हवेलीतील अनेक भाजप पदाधिकाऱ्यांनी पाठपुरावा सुरू केला. त्यातीलच एक भाग म्हणून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली असता त्यांनी वरील माहिती दिली. यावेळी यावेळी जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप कंद, भाजप जिल्हा सरचिटणीस सुदर्शन चौधरी, बाजार समितीचे संचालक राहुल गवारे, भाजप तालुकाध्यक्ष आबासाहेब सोनवणे, क्षेत्रीय रेल्वे समितीचे सदस्य अजिंक्य कांचन, मांजरीचे माजी सरपंच स्वप्नील उंद्रे उपस्थित होते.
शिरुर-हवेलीत भाजप शिष्टमंडळाने हायब्रीड ॲन्युईटी योजने अंतर्गत पाबळ – तळेगाव -शिक्रापूर -शिंदवणे या राज्यमार्गांला २८७ कोटी इतका निधी २०१७ मध्ये मंजूर केला आहे. तसेच लोणीकंद – थेऊर अष्टविनायक मार्ग अतिशय संथगतीने सुरू आहे. या मार्गांवर गेली अडीच वर्षात पाठपुरावा न झाल्याने काम संथगतीने सुरू आहे. त्यामुळे पालकमंत्री तातडीने या मार्गाचे अर्धवट काम पूर्ण करावे अशी मागणी केली आहे.
माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांनी वाघोली ते शिरुर हा सहापदरी मार्ग तसेच या मार्गांवर उड्डानपूल तसेच चाकण रस्ता, जातेगाव ते कासारी फाटा हा बायपास मार्ग तयार केले होते. ही कामे पूर्ण करण्यात यावी. त्याचबरोबर न्हावरा -चौफुला रस्तावरील उर्वरीत टप्पा मंजुर करावा अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
यापुढे बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, पुणे- नगर रस्त्यावरील वाघोली ते शिक्रापूर रस्त्याचे सहापदरीकरण काम हायब्रीड ॲन्युटी योजनेतून पूर्णत्वास जात आहे. सन २०१७ मध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना चंद्रकांत पाटील यांनी राज्यामध्ये प्रथमच हायब्रीड ॲन्युटीप्रकल्प सुरु करून त्यात वाघोली-शिक्रापूर-शिरूर हा संपूर्ण सहापदरी मार्ग प्रस्तावित करून ४६२ कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यताही दिली होती. उर्वरीत कामासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्याशी बैठक घेणार आहेत असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, सन २०१८ मध्ये वाघोली ते शिरूर हा संपूर्ण पुणे-नगर महामार्ग हायब्रीड अॅन्युटी योजनेत घेण्याचा निर्णय होताच हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग घोषित झाल्याने शिक्रापूर- शिरूर रस्त्याचे काम रखडण्याची चिन्हे दिसू लागल्यावर तत्कालीन आमदार बाबूराव पाचर्णे यांनी आपल्या पदाच्या राजीनाम्याचाच इशारा तत्कालीन मुख्यमंत्री व पक्षश्रेष्ठींना दिला होता. याची आठवण मात्र या बैठकीत चंद्रकांत पाटील यांनी आवर्जून काढल्याचे राहुल गवारे यांनी सांगितले.