लोणी काळभोर : पुणे जिल्ह्यात मागील 15 ते 20 वर्षापासून इंधनचोरी करून धुमाकूळ घालणारा लोणी काळभोर (ता. हवेली) येथील इंधन माफिया टोळीचा प्रमुख प्रवीण मडीखांबे याला पुणे शहर पोलिसांनी बुधवारी (ता. 27) अटक करण्यात आली होती. पोलिसांनी मडीखांबेला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आरोपीला 7 दिवसांची पोलीस कोठडीमध्ये रिमांड सुनावली आहे.
लोणी काळभोर (ता. हवेली) येथील इंधन माफिया टोळीचा प्रमुख प्रवीण मडीखांबे हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे. त्याने संघटित गुन्हेगारी टोळी तयार केली आहे. त्याने बेकायदेशीर कृत्य चालु ठेऊन संघटना किंवा टोळी म्हणून संयुक्तपणे संयुक्त गुन्हेगारी कृत्य करणारा गट तयार केला आहे. सदर टोळीने मागील 15 वर्षात पेट्रोल डिझेल चोरीचे गुन्हे पुन्हा पुन्हा केलेले आहेत. त्यांच्या या कृत्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे या 11 जणांच्या टोळीवर कायद्याचा वचक बसावा म्हणून या अगोदरच महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोका) सन 1999 चे कलम 3 (1) (ii) 3(2), 3/4) या अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
लोणी काळभोर व मुंढवा पोलिस हे लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोल-डिझेल चोरीचे गुन्हे रोखण्यासाठी मंगळवारी (ता. 10 सप्टेंबर) गस्त घालत होते. गस्त घालत असताना, कुंजीरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील थेऊर फाट्याजवळ असलेल्या एका रिकाम्या जागेत पत्र्याच्या शेडजवळ टँकरमधुन इंधन चोरी केली जात आहे. अशी माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी जाऊन इंधन चोरीचे मोठे रॅकेट उद्ध्वस्त केले होते.
या गुन्ह्यातील मुख्य आरोपी प्रविण मडीखांबे हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार झाला होता. मागील तीन महिन्यांपासून पोलिसांना चकवा देत होता. आरोपी प्रविण मडीखांबे हा पुण्यात वकिलाला भेटण्यासाठी येणार आहे. अशी माहिती पुणे शहर पोलिसांच्या पथकाला मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचून प्रविण मडीखांबेला मोठ्या शिताफीने अटक केली आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने 5 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीमध्ये रिमांड ठोठाविली आहे.