पुणे : फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये (एफटीआयआय) हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी कॅम्पसमध्ये घुसून विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विद्यार्थी संघटनांकडून लावलेल्या वादग्रस्त बॅनरवरून ही मारहाण झाल्याचे उघडकीला येत आहे. दरम्यान, पोलिसांनी मारहाण झालेल्या विद्यार्थ्यांना तातडीने वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल केले असून, संस्था परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या वादानंतर संस्थेच्या आवारातून बाबरी मशिदीचा उल्लेख असलेला बॅनर काढण्यात आला.
‘एफटीआयआय’मधील विद्यार्थी संघटनांकडून बॅनर झळकवण्यात आले होते. त्यावर आक्षेप घेत हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी कॅम्पसमध्ये घुसून विद्यार्थ्यांना मारहाण केली. विद्यार्थी संघटनांकडून केलेल्या बॅनरवर बाबरी मशिदीचा उल्लेख होता. हिंदुत्वादी संघटनेच्या कार्यकर्त्यांना याबाबत माहिती मिळताच कार्यकर्त्यांनी ‘एफटीआयआय’मध्ये घुसून बोर्ड लावणाऱ्या विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. या प्रकारामुळे ‘एफटीआयआय’मध्ये तणावाचे वातावरण आहे.
‘एफटीआयआय’ सातत्याने चर्चेत असते. यापूर्वी ‘एफटीआयआय’च्या संचालकपदी अभिनेते गजेंद्र चौहान यांची नियुक्ती केल्यानंतर विद्यार्थ्यांनी मोठे आंदोलन सुरू केले होते. अनेक दिवस हे आंदोलन सुरू होते. विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळण्यापेक्षा कॅम्पसचे भगवेकरण सुरू असल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात आला होता. अनेक दिवस हे आंदोलन सुरू होते. या आंदोलनाच्या मागे अतिडाव्या विचारांच्या संघटना असल्याचा आरोप करण्यात आला होता.
यापूर्वी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात नोव्हेंबर महिन्यात स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या दोन विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली होती. यामध्ये दोन्ही बाजूचे कार्यकर्ते जखमी झाले होते. एसएफआयकडून सभासदनोंदणी सुरू असताना अभाविपच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप एसएफआयच्या विद्यार्थ्यांनी केला होता. या घटनेनंतर पुन्हा कॅम्पसमध्ये नवसमाजवादी संघटनेच्या कार्यकर्त्यांवर भाजपशी संबंधित संघटनांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याची घटना समोर आली होती. आता हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी कॅम्पसमध्ये घुसून विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.